
पेट्रोल–डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने अनेक जण आता इलेक्ट्रिक गाडय़ांचा पर्याय निवडत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता इलेक्ट्रिक गाडय़ांमध्ये दिवसेंदिवस नवनवीन टेक्नोलॉजी येत आहे. इलेक्ट्रिक गाडी घेतल्यावर अनेकांना चार्जिंगचा प्रश्न सतावतो. परंतु इंजिनिअरिंग कॉलेजात शिकणाऱया काही विद्यार्थ्यांनी अनोखी ई-बाईक तयार केली आहे. विशेष म्हणजे या बाईकला वायरलेस चार्जिंग करता येणार आहे.
केएल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या तिसऱया आणि चौथ्या वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने ही कमाल करून दाखवली आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी जुन्या बाईकचे रुपांतर ई-बाईकमध्ये केले आहे. बाईकच्या डिझाईनमध्ये आवश्यक बदल केले आहेत ज्यात कंट्रोलरच्या माध्यमातून बीएलडीसी अर्थात ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटरला गियर मॉडय़ुलमध्ये बदलले आहे. या बाईकचा टॉप स्पीड 55 कि.मी. प्रतितास आहे. पाच तासांच्या चार्जिंगमध्ये ही बाईक 80 ते 100 कि.मी. अंतर कापू शकते, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. चार्जिंग टेक्निकला प्रोग्रामेबल सेल बॅलन्सिंग फिचरसोबत जोडले आहे.


























































