अर्जित रजा रोखीकरण बंद केल्याने तंत्रशिक्षण विभागात संतापाची लाट; २३ मार्चला मुंबईत ‘एल्गार’ धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काचे अर्जित रजा रोखीकरण बंद करण्याचा निर्णय शासनाला महागात पडण्याची चिन्हे आहेत. वित्त विभागाच्या या ‘अन्यायकारक’ निर्णयाविरोधात राज्यातील सर्व तंत्रशिक्षण संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या २३ मार्च २०२६ रोजी मुंबईतील तंत्रशिक्षण संचालनालयासमोर राज्यव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यापूर्वी ४ मार्चपासूनच काळ्या फिती लावून निषेध नोंदवला जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

तंत्रशिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार सुटीच्या काळातही काम करावे लागते. या कामाच्या बदल्यात जमा होणाऱ्या अर्जित रजेचे निवृत्तीनंतर रोखीकरण करण्याची पद्धत १९८१ पासून सुरू आहे. मात्र, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी वित्त विभागाने एका संदिग्ध पत्रान्वये उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी हे रोखीकरण अनुज्ञेय नसल्याचे कळवले. उच्च आणि तंत्रशिक्षण हे दोन स्वतंत्र विभाग असतानाही, या पत्राचा चुकीचा अर्थ लावून तंत्रशिक्षण विभागाचे देयक थांबवण्यात आले आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे:

  • ४ मार्च २०२६ पासून: राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर हजर राहतील आणि आपला निषेध नोंदवतील.

  • २३ मार्च २०२६: मुंबईतील तंत्रशिक्षण संचालनालयासमोर भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाईल.

  • पुढचा इशारा: जर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर आगामी परीक्षा, पेपर तपासणी आणि प्रवेश प्रक्रियेच्या काळात सर्व कर्मचारी दीर्घ सुटीवर जाऊन कामकाज ठप्प करतील.

अनेक संघटनांचा पाठिंबा

या आंदोलनात TEECAM, MGPATWA, GATIWEB, CUTA आणि META यांसारख्या प्रमुख शिक्षक व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. “अर्जित रजा हा आमचा कायदेशीर हक्क आहे आणि तो हिरावून घेण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागाचे कामकाज ठप्प होईल,” असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.