मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी एकूण 52 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 26 ऑगस्टपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. या निवडणुकीतून शिंदे गट आणि मनसेने सपशेल माघार घेतली असून युवासेना आणि अभाविपने सर्वच्या सर्व 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
पदवीधर सिनेटसाठी 22 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. शेवटच्या दिवशी तब्बल 30हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गातील 5 जागांसाठी 25 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी अर्ज अनुसूचित जमातीच्या 1 जागेसाठी 4 आणि त्यासोबत डीटी, एनटी प्रवर्गांच्या एका जागेसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती, ओबीसी आणि महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रत्येकी एका जागेसाठी प्रत्येकी 6 असे एकूण 52 अर्ज दाखल झाले आहेत.
पदवीधर सिनेटसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने मागील आठवड्यातच आपले दहा उमेदवार मैदानात उतरवले आहेत. युवासेनेने यंदा 5 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर भाजपप्रणित अभाविपनेही आपले सर्व 10 उमेदवार उभे केले आहेत. शिंदे गट आणि मनसेकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आला नाही. तर छात्रभारती संघटनेने चार उमेदवार तर अपक्ष चार उमेदवार सदर निवडणुकीत सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी यंदा अपक्ष अर्ज भरला आहे.