एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे

एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम कार्डची गरज लागते, पण स्मार्टफोनचा वापर करूनही कॅश काढता आली तर किती बरे होईल ना… लवकरच गुगल पे, फोन पेसारख्या यूपीआयचा वापर करून कॅश काढता येणार आहे. सध्या यूपीआयवरून पैसे पाठवणे, बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग करणे सोपे आहे. आता लवकरच कॅश काढणेही शक्य होईल, असा दावा केला जातोय.

यूपीआय आणखी सहजसोपे आणि उपयोगी कसे बनेल यावर काम सुरू आहे. आपल्याला ठाऊक आहेच की, अनेक जण बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करतात. एनजीओ, स्वयंसहायता गट, मायक्रो फायनान्स संस्था किंवा इतर नागरी संस्था यांसारख्या संस्था बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. त्यांच्याकडे क्यूआर कोड असेल. आपल्या यूपीआयवरून हे क्यूआर कोड स्कॅन करायचे. त्यानंतर बँक करस्पॉन्डंट तुम्हाला कॅश देईल. तुमच्या खात्यातून पैसे कट होतील. ते बँक करस्पॉन्डंटच्या खात्यात जातील.

सध्या यूपीआयवरून कार्डचा वापर न करता पैसे काढण्याची सुविधा यूपीआय एनेबेल एटीएमवर उपलब्ध आहे. काही दुकानदार ही सुविधा देतात. त्या ठिकाणी फक्त एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपये काढू शकतो. ही सुविधा आता देशभरातील 20 लाखांपेक्षा जास्त बँक करस्पॉन्डंटपर्यंत पोहोचवायचा सरकारचा प्रयत्न आहे.

नॅशनल बँक करस्पॉन्डंटच्या माध्यमातून यूपीआयचा वापर करून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँकेकडे केलेली आहे. त्यावर अद्याप विचारविनिमय आणि नियोजन सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर यूपीआयमधून पैसे काढण्याची सुविधा सुरू झाली की, यूपीआय जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असे म्हटले जातेय.