
‘‘आर्थिक बाबतीत अमेरिका ‘बेस्ट आणि हॉटेस्ट’ आहे. अमेरिका नसेल तर जग मृतवत होईल. जगाला अर्थच उरणार नाही,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे ठाम समर्थन करताना ट्रम्प यांनी स्वतःची पाठही थोपटून घेतली. ‘‘माझ्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात प्रचंड मोठे काम झाले. बायडन यांचे सरकार आल्यावर देशाचा पुन्हा ऱहास झाला. आता टॅरिफने अमेरिकेला आणखी बळ दिले आहे. टॅरिफने अमेरिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर पैसा येत आहे. अमेरिकेला अनेक बाबतीत फायदा झाला आहे,’’ असे ते म्हणाले.
हार्ले-डेव्हिडसन बाईकवर लागणाऱया 100 टक्के टॅरिफचा दाखला देत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी हिंदुस्थानवर पुन्हा निशाणा साधला.
सात युद्धे थांबवली!
व्यापार धोरणाच्या बळावर मी जगातली सात युद्धे थांबवली, असे सांगताना अणुयुद्धाच्या दिशेने चाललेल्या हिंदुस्थान–पाकिस्तानचा वादही सोडवला, असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला.
टॅरिफची ताकद काय असते ते मला कळलंय. जगातल्या कुठल्याही माणसापेक्षा टॅरिफ मला जास्त समजते. हिंदुस्थान जे काही बनवायचा, ते सगळे आमच्याकडे अक्षरशः ओतायचा. आता त्यांनी मला ऑफर दिलीय. ते आता म्हणतायत, आम्ही टॅरिफ लावणार नाही. मी टॅरिफ लादलं नसतं तर त्यांनी ही ऑफर दिलीच नसती. म्हणून टॅरिफ हवंच!’