
राजस्थानमधील भीलवाडा येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाने भारतीय जनता पक्षाच्या माजी नेत्यासह 12 जणांवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे पीडितने सांगितले. आरोपींमध्ये भाजपच्या माजी नेत्यासह पीए, बॉडिगार्ड आणि एका अतिरिक्त पोलीस अधिक्षकाचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अजमेर जिल्हापरिषदेच्या प्रमुख आणि माजी आमदार सुशील कंवर यांचे पती माजी भाजप नेते भंवर सिंह पलाडा यांच्याविरोधात महिला पोलीस उपनिरीक्षकाने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी भीलवाडातील प्रताप नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांच्याही नावाचा समावेश आहे.
आरोपी भंवर सिंह पलाडा यांनी लग्नाचे आमिष दाखवून 2018 ते 2021 दरम्यान वारंवार बलात्कार केला. भीलवाडा येथील पोलीस लाईनमध्ये असणाऱ्या घरी त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय गुप्ता, ड्रायव्हर रविंद्र, पीए किशनपुरी, बॉडिगार्ड करण, बजरंग, विज, मनिषा, धीरज आणि महिला कॉन्स्टेबल रश्मी व शिव बन्ना यांच्यावर पीडितेने आरोप केला आहे.
पीडितेने 2018 मध्ये बदली प्रकरणी नागौरचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांच्या शिफारसीवरून पलाडा यांच्याशी संपर्क साधला होता. विधानसभा पोटनिवडणुकीवेळी पलाडा यांनी पोलीस लाईनमधील घरी येऊन बलात्कार केला. विरोध केल्यावर रिव्हॉल्व्हर दाखवून मारण्याची भिती दाखवली. तसेच यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्ष लैंगिक शोषण केले.
एप्रिल 2021 मध्ये जोधपूर येथे पलाडा आणि अन्य लोकांनी मारहाण करून अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने केला. तसेच आपली हत्या होऊ शकते असेही पीडितेने म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर प्रतापनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली असून भीलवाडाचे एसपी आदर्श सिद्धू यांनी प्रकरणाचा तपास शाहपुरा येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंचल मिश्रा यांच्याकडे सोपवला आहे.
सहा वर्षांसाठी निलंबन
दरम्यान, अजमेर जिल्हापरिषद निवडणुकीवेळी सुशील कंवर पलाडा आणि पती भंवर सिंह पलाडा यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून काँग्रेसचे समर्थन केले होते. त्यामुळे पलाडा पती-पत्नीची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.




























































