नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा नव्या आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा विभागीय आयुक्तपदी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांची नागपूरच्या 32 व्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा या 2001 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत.  सातारा तालुक्यातील खटाव येथील असलेल्या प्राजक्ता वर्मा या एका सामान्य कुटुंबातील आहेत. मुंबई महापालिकेत इन्स्पेक्टर राहिलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना जिद्दीने आयएएस केले. प्रशासनाला लोकाभिमुख चेहरा देणाऱया अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.

संभाजीनगर जिह्यातील वैजापूर येथे 2003 मध्ये काम करीत असताना महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला 17 लाखांचे पहिले बक्षीस मिळाले. 2009 मध्ये धुळे जिल्हाधिकारी असताना धवल भारती अभियान राबवून शेतकऱयांनी दुग्धव्यवसायाकडे वळावे म्हणून प्रयत्न केले. सिडकोमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांचे गावठाणासह यशस्वी पुनर्वसन कोणताही संघर्ष न होता केले.