
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा चेहरा फाडला असून, हाताचा डावा अंगठा तुडला आहे. अरुणा रामनाथ शिंदे असे या महिलेचे नाव आहे.
रहिमपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पाठीमागील वस्तीत रामनाथ शिंदे यांचे घर आहे. घराजवळ गोठा आहे. गोठ्याच्या शेजारी ओढा आणि शेतजमीन आहे. मंगळवारी सायंकाळी अरुणा शिंदे यांनी कुटुंबीयांसह जेवण करून त्या झोपल्या होत्या. अरुणा आणि त्यांचे पती घराच्या पडवीत झोपले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्याने पडवीत प्रवेश करीत झोपलेल्या अरुणा शिंदे यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी केलेल्या आरडाओरड्याने त्यांचे पती रामनाथ हे जागे झाले. त्यांनी काठीने बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी घरातील मुलगा, सून आणि वस्तीवरील इतर लोक धावत आल्याने बिबट्याने धूम ठोकली.
अरुणा शिंदे यांचा एका बाजूचा गाल बिबट्याने पूर्ण फाडला, तर डोळ्यांभोवतीही जखमा झाल्या आहेत. तसेच प्रतिकार करताना त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा बिबट्याच्या जबड्यात सापडल्याने तो तुटून खाली पडला. अरुणा शिंदे यांनी डोक्याला स्कार्फ बांधला होता. बिबट्याच्या हल्ल्यात डोक्याचा स्कार्फ गळ्याजवळ आल्याने बिबट्याला गळ्याला दुखापत करता आली नाही. या हल्ल्यात अरुणा शिंदे यांचा जीव वाचला असला, तरी त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना अहिल्यानगर सिव्हिल रुग्णालयात पाठविले. तेथील डॉक्टरांनी अरुणा शिंदे यांची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या घटनेने रहिमपूर परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.