
पुरुष एखाद्या महिलेकडे वाईट नजरेने बघतो किंवा तिला स्पर्श करतो त्यावेळी त्याचा नेमका हेतू काय आहे हे त्या स्त्रीला कळते. तशी दैवी देणगीच स्त्रीयांना लाभलेली आहे असे निरीक्षण न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नोंदवले. अल्पवयीन अभिनेत्रीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टाने हे मत नोंदवले.
2017 साली व्यावसायिक असलेला विकास सचदेव दिल्लीहून मुंबईत परतत असताना अल्पवयीन असलेल्या अभिनेत्रीचा त्याने विमानात विनयभंग केला. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विकासविरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याला तीन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने ठोठावली.
सत्र न्यायालयाने आपल्याला दोषी ठरविण्यात चूक केली असून पीडितेने खटल्यात आपली ओळखही दिली नाही. त्यामुळे आपली शिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी करत सचदेव याने हायकोर्टात शिक्षेविरोधात अपील केले. या याचिकेवर हायकोर्टात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी सत्र न्यायालयाने विकासला तीन वर्षांसाठी सुनावलेली शिक्षा तूर्तास स्थगित केली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. अनिकेत निकम यांनी असे काही घडलेच नाही. आपले अशील निर्दोष असल्याचा दावा केला, मात्र न्यायमूर्तीनी हा दावा फेटाळून लावला.
एखाद्या वेळेस स्त्रीयांना याची कमी माहिती असेल, परंतु त्यांना नकोसा स्पर्श लगेच समजतो. एवढेच काय तर शाळेत विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे पीडित अभिनेत्रीचा दावा खोटा असू शकत नाही असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले व या प्रकरणावरील सुनावणी तहकूब केली.






























































