खदाणीत पडून महिलेचा मृत्यू

208
sunk_drawn_death_dead_pic


परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथील परिसरातील एका मोठ्या खदाणीमध्ये पडून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 11.30 वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचे पाथरी विधानसभेचे संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे यांच्या त्या भावजयी आहेत.

परभणी तालुक्यातील पोखर्णी नृं. येथील मालनबाई रतन पतंगे (45) महिला कपडे धुण्यासाठी खदान परिसरात गेली होती. दगडावरील शेवाळावरुन पाय घसल्याने तिचा तोल गेला व ती खोल पाण्यात बुडाली. ही घटना घडली तेव्हा तिथे अन्य महिलाही उपस्थित होत्या. पण कोणालाच पोहता येत नसल्याने मालनबाईंना वाचवणे शक्य झाले नाही. दुपारी 2 च्या सुमारास ग्रामस्थांनी लोखंडी गळाच्या सहाय्याने मालनबाईंचा मृतदेह बाहेर काढला. मालनबाई पतंगे यांच्या पश्चात आई, दोन मुले, दिर असा मोठा परिवार आहे. दरम्यान, दुपारी दैठणा पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्याचे एपीआय तरकसे यांनी घटनास्थळी भेट दिली. नरेश वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ए.एस.आय केंद्रे करीत आहेत.

पोखर्णी नृसिंह वस्तीच्या लगत असलेल्या ही मोठी खदाण असून ती उघडीच आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठी जनावरे व कपडे धुण्यासाठी महिलांची मोठी गर्दी असते. मागील आठवड्यात एक वृद्ध महिला याच पाण्यात पडून जखमी झाली होती. याआधी चार ते पाच घटना घडल्या होत्या. पण तरी देखील ग्रामपंचायत किंवा खदाणीचा संबंधित मालक खदाणीभोवती संरक्षण भिंत किंवा उपाययोजना करत नाहीत. तरी ग्रामपंचायतीने वस्तीच्या बाजुने तरी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या