
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मिंधे सरकारकडून कडक उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. आज त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवती सेनेने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी युवती सेनेच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी राज्यपालांना अवगत केले.
युवती सेना तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राज्यपालांशी संवाद साधला. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये हजारो मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत. महिलांवर अत्याचाराच्या घटनाही वारंवार घडत आहेत. तरीही राज्य सरकार कडक उपाययोजना करत नाही. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, ज्योती ठाकरे यांच्यासह युवासेना कार्यकारिणी सदस्या शीतल शेठ-देवरुखकर, सुप्रदा फातर्पेकर, राजोल पाटील, धनश्री कोलगे, युवासेना उपसचिव रेणुका विचारे, मलबार हिल युवती विभागाधिकारी लायना रामगिरी, वैष्णवी चव्हाण-ठाकूर, मुंबई समन्वयक प्रियांका गोकर्णे, पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर, अंजली नाईक, माजी महापौर श्रद्धा जाधव, दीपमाला बढेकर, विभाग संघटिका पद्मावती शिंदे, महिला विभागप्रमुख युगंधरा साळेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे आदी उपस्थित होते.



























































