कोपरगाव शहरात घरगुती गॅसच्या भडक्याने महिला गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

शहरातील खंदकनाला येथील आर आर सर्व्हिस स्टेशन जवळील असलेले हॉटेल न्यू सागर येथे भारत गॅसच्या सिलेंडरच्या टाकीचा पाईप लिक झाल्याने गॅसचा भडका होत कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी जवळ राहणाऱ्या मोरे कुटुंबातील महिला गंभीररित्या भाजली असून तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येवून पुढील उपचारासाठी प्रवरानगर येथे हलविण्यात आले.

शहरातील भुरूभाई पठाण यांच्या हॉटेल न्यू सागरमध्ये मोरेबाई हि मंगळवार दिनांक २३ ऑक्टोबर पासून कामाला आलेली होती. या महिलेचा कामावरचा बुधवारचा हा दुसराच दिवस होता. दुपारी साडेबारा ते एक या मधील काळात या हॉटेलमध्ये असणाऱ्या घरगुती वापरातील भारत गॅस सिलेंडर टाकीचा पाईप लिक झाल्याने अचानक भडका झाला अन हॉटेल मधील कामगार महिला मोरेबाई ही गंभीर जखमी झाली. या महिलेस आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत या महिलेस बाहेर काढले. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे अन संजीवनी कारखान्याची अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या अन आग विझवण्यास सुरवात केली आग विझवत असतांना दुसऱ्या देखील टाकीने पेट घेतला. अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले असून जखमी झालेल्या महिलेस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र या महिलेस पुढील उपचारासाठी प्रवरा नगर येथे हलविण्यात आले असल्याचे समजते आहे. शहरात अशा कित्येक छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅसचा वापर करत असतांना दिसून येत आहे. हॉटेल न्यू सागरमध्ये ही दोन घरगुती गॅस सिलेंडर आणि एक कमर्शिअल गॅस सिलेंडर आढळून आले आहे.