
उरण तालुक्यात एका 35 वर्षीय महिलेने खोपटा पुलावरून खाडीत उडी घेतली आहे. रोहिणी तांडेल असे या विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेचा सध्या शोध सुरू आहे.
सोनारी येथील रहिवासी असलेल्या रोहिणी पती आणि दोन मुलींसह राहात होत्या. रोहिणी सोनारी येथील सीडब्ल्युसी गोदामातील ओरिएंटल फॅसिलिटी कंपनीत हाऊसकिपिंगचे काम करत होत्या. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता कामासाठी निघालेली ही महिला पाच- सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खोपटा पुलावर पायी चालत आली आणि पुलावरून थेट खाडीत उडी घेतली. खाडी परिसरातच किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या स्थानिकांनी या महिलेला उडी मारताना पाहिले. त्यांनी तत्काळ उरण पोलिसांना कळवून महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यत उरण पोलिस निरीक्षक अतुल अहेर अग्नीशामक दलाचे जवान, डायव्हर्ससह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता महिलेसाठी शोधकार्य सुरू केले आहे. पुलावरच महिलेची पिशवी सापडली. पिशवीत जेवणाच्या डब्यासह ओळखपत्रही सापडले. बेपत्ता महिलेच्या सापडलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली आहे. सध्या बेपत्ता महिलेचा युध्दपातळीवर शोध घेतला जात असल्याची माहिती उरण पोलिस निरीक्षक अतुल अहेर यांनी दिली. महिलेने हे कृत्य का केले अजून कळालेले नाही.
























































