महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा, निखत झरीनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार बॉक्सर निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. 50 किलो गटात तिने अव्वल मानांकित अल्जेरियाच्या रुमायसा बौलमचा 5-0 गुण फरकाने फडशा पाडत आगेकूच केली.

खाशाबा जाधव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत निखत झरीनने 5-0 फरकाने विजय मिळविला असला तरी ही लढत अतिशय चुरशीची झाली. सुरुवातीला उभय खेळाडूंनी सावध पवित्रा घेत एकमेकींचा अंदाज घेणे पसंत केले. सुरुवातीला रुमायसाने निखतला अनेक ठोसे लगावले. मात्र निखतने कमी ठोसे लगावले असले तरी त्यात अचूकता होती. त्यामुळे तिने पहिली फेरी जिंकली. दुसऱ्या फेरीत रुमायसा अधिक आक्रमक दिसली. निखतनेही तिला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. दोन्ही बॉक्सर बॉडी क्लिनिंग करताना दिसल्या. या चुरशीच्या लढतीत सर्वच पंचांनी निखत झरीनच्या बाजूने 5-0 असा कौल दिल्याने प्रेक्षकांनी एकच जल्लोष करून स्टेडियम डोक्यावर घेतले. 26 वर्षीय निखतची गाठ आता मेक्सिकोच्या फातिमा हेरेरा हिच्याशी पडणार आहे.

पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व गाजविण्याची माझी रणनीती होती. कारण रुमायसादेखील एक फायटर बॉक्सर आहे, याची मला कल्पना होती. एक अवघड लढत जिंकल्याने साहजिकच मनोबल उंचावले आहे. आता आगामी लढतीवर लक्ष्य केंद्रित करेन.
– निखत झरीन