महिला जागतिक बॉक्सिंग; निखत झरीनचा धडाकेबाज विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची आघाडीची बॉक्सर निखत झरीन हिने अझरबैजानच्या अनाखानिम इस्माइलोवा हिला जबरदस्त पंच लगावत महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. निखतचे ठोसे इतके जबरदस्त होते की पंचांनी ही लढत थांबवून हिंदुस्थानी खेळाडूला विजयी घोषित केले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या निखत झरीनने 50 किलो गटात रिंगमध्ये उतरल्यानंतर काही खेळ प्रतिस्पर्धी अनाखानिम इस्माइलोवाच्या ताकदीचा थोडा अंदाज घेतला, मात्र त्यानंतर निखतच्या जबरदस्त पंचमुळे अझरबैजानची खेळाडू सैरभैर झाली. त्यामुळे पंचांना या लढतीत हस्तक्षेप करावा लागला. दुसऱया फेरीत लढत थांबवून पंचांनी हिंदुस्थानच्या निखतला विजयी घोषित केले. निखतची पुढची लढत रॉमेसा बॉआलम हिच्याशी आहे. दुसरीकडे 52 किलो गटात हिंदुस्थानच्या साक्षी कुमारीने कोलंबियाच्या मार्टिनेज मारिया जोसचा 5-0 फरकाने पराभव केला. या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या साक्षी व मार्टिनेज यांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला, मात्र त्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.

‘मनासारखा ड्रॉ मिळाला आहे. पुढे काही कठीण लढती आहेत याची मला कल्पना आहे. स्पर्धेची सुरुवात तर धडाक्यात झाली आहे. दुसऱ्या फेरीत माझी गाठ रॉमेसा बॉआलम हिच्याशी आहे. तिच्याविरुद्ध मी अद्याप खेळलेली नाहीये, पण मला तिचा खेळ माहीत आहे. त्यामुळे आगामी लढतीतही मी नक्की विजय मिळवेन.’
– निखत झरीन