
महिला आयपीएल अर्थात वुमन्स टी-20 चॅलेंज स्पर्धेचे चौथे पर्व रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक देशांनी हिंदुस्थानातील विमानसेवा रद्द केल्याने परदेशी खेळाडूंना इकडे येण्यास अडचणी येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याबाबत ‘बीसीसीआय’ गंभीरपणे विचार करत आहे.
‘बीसीसीआय’ तीन वर्षांपासून महिलांच्या आयपीएलचे आयोजन करत आहे. गतवर्षी 12 परदेशी महिला क्रिकेटपटूंनी वुमेन्स टी-20 चॅलेंज स्पर्धेत सहभाग घेतला होता.
त्यावेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांगलादेश व श्रीलंका या देशांतील महिला खेळाडू या स्पर्धेत खेळल्या होत्या.
यामध्ये डिएंड्रा डॉटिन, सुने लुस, डिनिएली व्याट व नथाकन चॅटम या स्टार खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत तीन संघांचा सहभाग असतो. महिलांची आयपीएल रद्द करण्याबाबत ‘बीसीसीआय’ने अद्यापि अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ही स्पर्धा रद्द करण्याबाबतचा निर्णय होणार आहे.
पंच मेनन यांची माघार
कोरोनाचा फटका आयपीएलला बसू लागला आहे. पंच नितीन मेनन यांनी याच कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. नितीन मेनन यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांनी तत्काळ हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रायफल यांनीही दोहामार्गे ऑस्ट्रेलियाला जाण्याची योजना बनविली होती. पण हिंदुस्थानातून येणाऱयांना ऑस्ट्रेलियात परवानगी नसल्यामुळे तसेच विमान सेवा स्थगित असल्यामुळे पॉल रायफल यांना हिंदुस्थानातच थांबावे लागले आहे. आता पुन्हा ते आयपीएल लढतींदरम्यान पंच म्हणून काम करणार आहेत.





























































