
4 जूनला रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सच्या (आरसीबी) आयपीएल जेतेपदाच्या जल्लोषासाठी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची विकेट काढली आहे. आगामी महिला वर्ल्ड कपचे साखळी सामने आणि अंतिम सामना चिन्नास्वामीला खेळविला जाणार होता. मात्र आयसीसीने महिला एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले असून बंगळुरूचा पत्ता कट करत नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमला त्या सामन्यांच्या आयोजनाची संधी दिली आहे. येत्या 30 सप्टेंबरपासून या स्पर्धेला हिंदुस्थान आणि श्रीलंकेत प्रारंभ होणार आहे.
आयपीएल जेतेपदाच्या विजय सोहळय़ाप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 क्रिकेट चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासून आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि चिन्नास्वामी स्टेडियमचे ग्रहच फिरले होते. त्यातच उच्च न्यायालयानेही चेंगराचेंगरीचे खापर त्यांच्यावर फोडले होते. त्यामुळेच आयसीसीने सुरक्षेबाबत असलेल्या परवानग्या मिळवण्यात केएससीए अपयशी ठरल्यामुळे त्यांना महिला विश्वचषकाच्या आयोजनातून बाद करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला.
नवी मुंबई सर्व दृष्टीने सोयिस्कर
चिन्नास्वामीला आयोजनापासून दूर केल्यानंतर त्याऐवजी थिरुवनंतपुरमचे नाव चर्चेत होते, पण थेट विमान उड्डाणांचा प्रश्न आडवा आला. अखेर नवी मुंबईने बंगळुरूला क्लीन बोल्ड करत विश्वचषकात आपली धडाकेबाज एण्ट्री घेतली आहे. नवी मुंबईत हिंदुस्थानचे 23 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 26 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध खेळले जाणारे दोन्ही साखळी सामने होतील. याशिवाय श्रीलंग-बांगलादेश (20 ऑक्टोबर), दुसरा उपांत्य सामना (30 ऑक्टोबर) आणि अंतिम सामना (2 नोव्हेंबर) खेळविला जाणार आहे. फक्त अंतिम लढतीत पाकिस्तानी संघाने धडक मारली तर तो सामना कोलंबोला खेळविला जाईल. मात्र आधी हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील उद्घाटनीय सामना बंगळुरूला होणार होता, मात्र आता तो गुवाहाटीला होईल.