खालापुरात 58 योजनांची कामे कासव गतीने; सरकारने बिले लटकवली, ‘जलजीवन’ची कामे रखडणार

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून खालापूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ९२ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यातील ३४ पाणी योजनांचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित ५८ योजना लटकण्याची शक्यता आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकार ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बिले देत नसल्याने कामे कार्याची कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे काही कंत्राटदारांनी काम करताना हात आखडता घेतला आहे. खालापूर तालुक्यातील ९२ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी काम सुरू केले आहे.

यामधील तोंडली, शेणगाव, चिलठण, रानसई, तांबाटी, खरवई, जाबरुंग, आंबिवली, होनाड, उंबरविरा, नडोदे, दूरशेत, हाळखुर्द, होराळे, मोरबे, डोलवली व माणकिवली यांसह ३४ गावांच्या पाणी योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित ५८ योजनांचे काय प्रगतिपथावर आहे. पावसाळ्यानंतर पाणी योजना पूर्ण करून घेण्यासाठी खालापूर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग उपअभियंता संतोष चव्हाण सातत्याने ठेकदारांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु केलेल्या खर्चाच्या प्रमाणात देयके मिळत नसल्याने ठेकेदार कानाडोळा करत आहेत.

या गावांना फटका
आसरोटी, चांभार्ली, गोठिवली, इसांबे, खरिवली, माडप, नारंगी, निगडोली, परखंदे, वावोशी, नावढे, सारंग, विणेगाव, तळाशी, आंबेवाडी (वरोसेतर्फे वनखळ), कोपरी आंबेमाळवाडी, कुंभिवली, घोडिवली व कांढरोली, चावणी, आडोशी, बीड खुर्द, भिलवले, ढेकू, डोणवत, गोरठन खुर्द, हातनोली, जांभिवलीतर्फे छत्तिशी यांसह ५८ गावांतील योजना ल टकल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांवर आणखी काही वर्षे पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे.