
मुंबईला वाहतूककोंडीतून बाहेर काढणाऱया कोस्टल रोडचे काम प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, मुख्य सल्लागार यांच्यासह कंत्राटदारांच्या तज्ञांकडून सुरू आहे. कोस्टल रोड तयार करताना भराव योग्य, गुणवत्तापूर्ण रितीने होत असल्याची खातरजमा करण्यासाठी सल्लागारांकडून वेळोवेळी विविध चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत कोस्टल रोडचे 45 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.
मुंबईकरांना वाहतूककोंडीतून बाहेर काढणारा, मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) हा मेसर्स स्टुप आणि ई. वाय. यांनी तयार केला आहे. हा विस्तृत प्रकल्प अहवाल मसुदा (ड्राफ्ट डीपीआर) 2015 मध्ये पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला होता. या डीपीआरमध्ये वाहतूक मुद्दय़ाचे विश्लेषण असून महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण व वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयालादेखील ते सादर करण्यात आले आहे.
भरावाची जागा केवळ प्रकल्पासाठीच
मुंबई महापालिकेने मे 2019 मध्येच भरावाची जागा केवळ प्रकल्पासाठीच वापरली जाणार असल्याचे परिपत्रक काढलेले आहे. किनारा रस्त्याला लागून भरावाच्या खुल्या जागेमध्ये कोणताही निवासी, व्यावसायिक किंवा इतर पद्धतीचा विकास करण्यात येऊ नये, असे परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे. परिपत्रकात महापालिका प्रशासनाने केंद्रीय पर्यावरण व वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाला दिलेले हमीपत्र अशा स्वरूपातच हे परिपत्रक ग्राह्य धरले जाणार आहे. हे परिपत्रकदेखील केंद्रीय पर्यावरण व वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाला या आधीच सादर केले असून मंत्रालयानेही ते स्वीकारले आहे.
मच्छीमार बांधवांच्या पुनर्वसनासाठी समिती
प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांच्या पुनर्वसनासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आधीच समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच मच्छीमारांबरोबर संवाद साधण्यासाठी पालिकेच्या वतीने कार्यसंघ गठीत करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर होणारा तात्पुरता परिणाम टाटा समाजविज्ञान संस्था अभ्यासणार असून पुढील कार्यवाहीची दिशा पालिका ठरवणार आहे. विशेष म्हणजे सागरी किनारा रस्ता प्रकल्पामुळे मासे वाळवण्याची कोणतीही जागा किंवा कोणतीही मच्छीमार वसाहत बाधित झालेली नाही. दरम्यान, प्रकल्पातील खुल्या जागेचे संरक्षण करण्यासाठीची योजना सध्या प्राथमिक स्तरावर आहे.






























































