तळावासीयांचा खडखड प्रवास थांबला; रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला सुरुवात

रस्त्याची चाळण झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमधून ये-जा करणाऱ्या तळावासीयांचा प्रवास आता सुकर होणार आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यामुळे विद्यार्थी, वृद्ध, महिला, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तळा बस स्थानकाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे बस स्थानकाची पुरती दुरवस्था झाली होती. स्थानक परिसरातील शौचालय तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. खडी आणि ओबडधोबड रस्त्यांमुळे बसचालकांना बस चालवताना नाकीनऊ येत होते. ही समस्या लक्षात घेऊन 14 ऑक्टोबर 2024 रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र याला आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला.

नागरिकांमध्ये समाधान
अखेर सोमवारी तळा बस स्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. सुरुवातीस बस स्थानकाचे काँक्रीटीकरणानंतर संरक्षक भिंत व त्यानंतर शौचालय अशा प्रकारे काम करण्यात येणार आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तळा बस स्थानकाचे काम सुरू झाल्याने शहरवासीयांसह तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.