वाह रे पठ्ठय़ा! तरुणाने खोल पाण्यात केलं वर्कआऊट!!

कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला स्वस्थ राहण्याची आवश्यकता आहे. यासाठी पौष्टिक आहारासोबत नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुदुच्चेरीमधील एका तरुणाने चक्क खोल पाण्यात वर्कआऊट करत अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे. या तरुणाचा ‘अंडरवॉटर वर्कआऊट’चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

अरविंद असे या तरुणाचे नाव असून तो गेल्या 20 वर्षांपासून चेन्नई आणि पुदुच्चेरी येथे स्कुबा डायविंगचे कॅम्पेन आयोजित करतो. कोरोनाच्या संकटात लोकांना फिटनेसचे महत्त्व कळावे यासाठी नुकताच त्याने खोल पाण्यात जाऊन व्यायाम केला आहे. प्रमोद माधव या युजरने त्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा व्हिडिओ लोकप्रिय झाला आहे. अवघ्या 50 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये अरविंद प्रोटेक्टिव्ह ग्लास घालून 14 मीटर खोल पाण्यात व्यायाम करताना दिसतोय. यात तो डम्बल कर्ल, बारबेल कर्ल आणि पुशअप्स असे व्यायामाचे प्रकार करताना दिसत आहे. लोकांनी दिवसातील किमान 45 मिनिटे शरीरस्वास्थासाठी तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी श्वासोच्छवासाशी संबंधित व्यायाम करावा, असे आवाहन अरविंदने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या