कामगारांनी स्थलांतर करू नये, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये तसेच अफवांना बळी पडू नये असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन हसन मुश्रीफ यांचे स्वागत केले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न

राज्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोविड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे.

सार्वजनिक वाहतूक सुरूच

उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारित असलेल्या सर्व कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निशंक राहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खासगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भीती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्थादेखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या