
हिंदुस्थानी अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मुडीज, फिज, स्टँडर्ड अँड पुअर्स यांच्याबरोबरीने आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला असताना आता वर्ल्ड बँकेनेही जागतिक मंदीमुळे हिंदुस्थानचा जीडीपी 6 टक्क्यांपर्यंत घसरेल, असे म्हटले आहे.
जागतिक बँकेने ‘साऊथ एशिया इकोनॉमिक फोरम’च्या अहवालात हिंदुस्थानच्या अर्थव्यस्थेबद्दलची मते जाहीर केली. या आधी हिंदुस्थानचा जीडीपी 6.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आज बँकेने 2019-20 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानचा जीडीपी 6 टक्के राहील, असे अहवालात म्हटले आहे. 2021मध्ये जीडीपी 6.9 तर 2022मध्ये तो वाढून 7.2 राहील, असे बँकेने म्हटले होते. मात्र, गेली दोन वर्षे जीडीपीची घसरण सुरू आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालात 2019-20मधील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात घट आली आहे.
गरिबी कमी झाली
हिंदुस्थानचा जीडीपी कमी होणार असला तरी यात गरिबी कमी झाली आहे, असे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. 2011-12 आणि 2015-16 मध्ये हिंदुस्थानची गरिबी 21.6 वरून 13.4 वर आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील ताण आणि शहरी भागांतील तरुणांच्या बेरोजगारीचा सगळय़ात मोठा फटका गरिबांना बसला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
औद्योगिक, सेवा क्षेत्राला मोठा फटका
2017-18पेक्षा 2018-19मध्ये डीडीपी दर 7.2 वरून घसरून 6.8 पर्यंत पोहोचला आहे. हिंदुस्थानात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. कृषी क्षेत्र 2.9 तर सेवा क्षेत्राचा दर 7.5 इतवाच मर्यादित राहिला आहे. मात्र, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात वाढ झाली असून ती 6.9 वर पोहोचली आहे.
नेपाळ, बांगलादेशचा जीडीपी वाढेल!
2019 या वर्षांत नेपाळ, बांगलादेशसारख्या शेजारी देशांचा विकास दर हिंदुस्थानपेक्षा जलद गतीने वाढणार आहे. महागाई आणि कर्जबाजारीत बुडालेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चांगला हादरा बसणार असून विकास दर 2.4 इतका नीचांकी पोहोचणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नियम कठोर झाल्यामुळे नाणेनिधीही पाकिस्तानला मदत करू शकणार नाही.
बँकिंग क्षेत्रात आधीच सुधारणा करायला हव्या होत्या!
जगात गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण नसल्यामुळे कंपनी आणि वैयक्तिक पातळीवर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली नाही. त्यामुळे जागतिक मंदीची स्थिती आली. पण हिंदुस्थानच्या आर्थिक मंदीला इतरही अनेक कारणे आहेत. गेली दोन वर्षे हिंदुस्थानने आपल्या आर्थिक क्षेत्रात काहीच सुधारणा केल्या नाहीत. विशेष करून बँकिंग क्षेत्रात सुधारणा करायला हव्या होत्या.
























































