
World Championship Of Legends (WCL) मध्ये हिंदुस्थान चॅम्पियन्सने सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. सेमी फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध हिंदुस्थानची भिडत होणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभुमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेमी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाने मंगळवारी (29 जुलै 2025) वेस्ट इंडिज चॅम्पियन्सला पराभवाची धुळ चारली आणि सेमी फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं. वेळापत्रकानुसार गुरुवारी (31 जुलै 2025) हिंदुस्थान चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये सेमी फायनलची लढत होणार आहे. पंरतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे. यापूर्वी साखळी फेरीतील पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यासही टीम इंडियाच्या खेळाडूंनी नकार दिला होता. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाचे खेळाडू सुरेश रैना, शिखर धवन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ते पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही. तसेच हरभजन सिंगने सुद्धा पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच नकार दिला होता.
हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाची सुरुवात या स्पर्धेमध्ये अत्यंत खराब झाली होती. पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्ध हिंदस्थान चॅम्पियन्सला विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. या सामन्यात हिंदुस्थान चॅम्पियन्सने 13.2 षटकांमध्येच सामना आपल्या खिशात घातला आणि सेमी फायनलच तिकीट पक्क केलं. परंतु आता पुन्हा एकदा खेळाडूंनी पाकिस्ताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. तसेच सेमी फायनलच्या सामन्यासाठी स्पॉन्सर असणाऱ्या EaseMyTrip या कंपनीने सुद्धा या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सेमी फायनलवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.