
>> गणेश पुराणिक
इंग्लंडमध्ये सुरू असलेला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. दोन तुल्यबळ संघातीत चुरशीच्या लढती पाहून चाहते आनंद लुटत आहे. रविवारी टीम इंडियाने पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली. परंतु या लढतीत झालेल्या एका प्रसंगामुळे पुन्हा एकदा यष्ट्यांवरील बेल्सची चर्चा रंगली आहे. वर्ल्डकप सुरू झाल्यापासून पाचव्यांदा चेंडू यष्ट्यांवर आदळला परंतु बेल्स काही पडल्या नाहीत.

वर्ल्डकपच्या लढतीदरम्यान पाचव्यांदा बेल्सचा खेळ पाहायला मिळाला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया लढतीदरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता आणि त्याच्यासमोर डावखुरा फलंदाज डेव्हीड वॉर्नर तळ ठोकून होता. बुमराहने टाकलेला चेंडू यष्ट्यांना घासून गेला परंतु बेल्सचे चिपको आंदोलन सुरुच राहिले. त्यामुळे वॉर्नरला नाबाद ठरवण्यात आले.
पहिल्या लढतीपासून बेल्सचा खेळ सुरू
क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीपासून बेल्सचा खेळ सुरू झाला आहे. पहिली लढत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात रंगली. या लढतीत आदिल राशिदच्या गोलंदाजीवर डि कॉक बाद होताना होण्यापासून बचावला. स्विप शॉट खेळताना चेंडू यष्ट्यांवर आदळला, परंतु बेल्स पडल्या नाही आणि डि कॉकला चौकारही मिळाला.
बार बार, लगादार
न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतही बोल्टने टाकलेला चेंडू करुणारत्नेकडून हुकला आणि यष्ट्यांवर आदळला, परंतु बेल्सने पुन्हा एकदा यष्ट्यांची साथ दिली. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया लढतीत स्टार्कच्या चेंडूवर गेल फसला आणि चेंडू यष्ट्यांना लागून यष्टीरक्षकाकडे गेला. यावेळीही बेल्स पडल्या नाहीत. इंग्लंड आणि बांगलादेश लढतीतही बेल्सचा खेळ सुरुच होता. स्टोक्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद सैफुद्दीन फलंदाजी करताना चेंडू यष्ट्यांना घासून गेला परंतु बेल्स पडल्या नाहीत आणि पाचव्यांना टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया लढतीतही सेम असाच प्रकार पाहायला मिळाला. वर्ल्डकप सुरू झाल्यापासून 11 दिवसात 5 वेळा असा प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विराट आणि फिंचने देखील या बेल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बेल्सची काय चूक
सातत्याने घडत असणाऱ्या या प्रकारावर आयसीसीने स्पष्टीकरण दिले आहे. सामान्य बेल्सप्रमाणेच या इलेक्ट्रॉनिक्स जिंग बेल्स काम करतात आणि इतर बेल्सपेक्षा या वजनाने हलक्या असतात असे म्हटले आहे. तसेच चेंडू आदळल्यानंतर लाईटही चमकतो. परंतु यष्ट्यांना चेंडू घासून गेला, लाईटही चमकली परंतु बेल्स पडल्या नाही तर लाईट चमकून उपयोग काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

























































