टीम इंडियाचा दुसरा पेपर; नागपूरमध्ये आघाडी 2-0 वर नेण्याचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या यंदाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची ऑडिशन मानल्या जाणाऱ्या हिंदुस्थान -ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने स्वतःला सावरत सलामीचा सामना जिंकून 5 एकदिवसीय लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण बलाढ्य कांगारूंना आणखी दबावाखाली आणण्यासाठी नागपूरची दुसरी लढत जिंकून आपली आघाडी 2-0 अशी वाढवण्याच्या निर्धाराने विराटसेना मैदानात उतरणार आहे. अर्थात कांगारूही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी नागपूरमध्ये यजमानांना कडवी झुंज देणार हे निश्चित. मंगळवारचा दुसरा पेपर हिंदुस्थानला सोपा जाणार की नाही, याचे उत्तर हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना मंगळवारी रात्रीच मिळणार आहे.

हैद्राबादच्या पहिल्या लढतीत टीम इंडियाने अखेरच्या काही षटकांत पाहुण्या कांगारूंना 6 विकेटसनी पराभूत करीत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या सलामीच्या विजयामुळे यजमान संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. शिवाय घरच्या मैदानात हिंदुस्थानी संघ आतापर्यंत बहुतांशवेळी यशस्वी ठरला आहे. वर्ल्डकपपूर्वीच्या या अखेरच्या मालिकेतून हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन विश्वचषकासाठीच्या संघातील उर्वरित 2 जागा कोणाला द्याव्यात हे ठरवणार आहे. या संघातील 13 खेळाडू जवळजवळ ठरलेले आहेत. त्यामुळे अनुभवी शिखर धवनच्या जागी संधी मिळाल्यास के. एल. राहुलला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या मालिकेत मिळणार आहे.

“हिटमॅन”रोहित शर्मा आणि “रनमशीन” कर्णधार विराट कोहली यांची धावांसाठीची भूक पाहुण्या कांगारूंना धडकी भरवणारी आहे. हे दोघे मैदानात बरसले तर ऑस्ट्रेलियन संघाला कोणीही तारू शकणार नाही. विराटने पहिल्या लढतीत 44 धावांची खेळी करीत हिंदुस्थानी संघाच्या विजयाला मोठा हातभार लावला होता.रोहितने या लढतीत 37 धावांची नोंद केली होती. पाहुण्यांच्या सुदैवाने रोहित आणि विराट मोठी खेळी करू शकले नाहीत.पण धावांसाठी भुकेले हे फलंदाज कधीही प्रतिस्पर्धी गोलंदाजांना “पळता भुई थोडी” करण्यास सक्षम असल्याची जाण पाहुण्या कांगारूंना आहे.

हैद्राबादमध्ये मराठमोळ्या केदार जाधवने नाबाद 81 धावांची खेळी करीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.तर 37 वर्षीय अनुभवी महेंद्रसिंग धोनीने नाबाद 59 धावा फटकावून त्याच्यातला मॅच फिनिशर संपला नसल्याचे दाखवून दिले आहे. धोनी, जाधव यांना गवसलेल्या सुरामुळे टीम इंडियाचे मधल्या फळीतील अपयश दूर झाल्याचे चित्र सध्या तरी आहे. त्यामुळे पाहुण्या कांगारूंच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. उर्वरित 4 लढतीत केदार ,धोनी जोडी संघासाठी चमकदार कामगिरी करणार असा विश्वास हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाला आहे.

हैद्राबादच्या पहिल्या वन डे लढतीत रवींद्र जाडेजाने किफायतशीर गोलंदाजी केली. पण विकेट मिळविण्यात मात्र त्याला यश आले नाही .त्यामुळे नागपूरमध्ये “चायनामन”कुलदीप यादवच्या जोडीला फिरकीवीर युजवेन्द्र चहल संघात पुनरागमन करण्याचे संकेत आहेत. प्रभावी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी आपले काम चोख बजावल्याने त्यांच्यावरच नागपूर लढतीत वेगवान माऱ्याची भिस्त असेल.

पाहुण्या कांगारूंचा कर्णधार आणि सलामीवीर एरॉन फिंच यांचे फलंदाजीतील अपयश त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मात्र त्याला सूर सापडेल अशी ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाला आशा आहे. शिवाय मॅक्सवेल ,सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अष्टपैलू स्टोयनिसने पहिल्या लढतीत सेट झाल्यावर ऐन वेळी आपल्या विकेट गमावल्या हि कांगारूंसाठी चिंतेची बाब ठरली. गोलंदाजीत फिरकीवीर ऍडम झम्पाने प्रभावी कामगिरी केली.पण त्याला अन्य गोलंदाजांची म्हणावी तशी साथ लाभली नाही.त्यामुळे पहिली लढत कांगारूंना गमवावी लागली होती.वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि नाथन कॉल्टर निले यांनी अधिक प्रभावी मारा केल्यास ऑस्ट्रेलियन संघाला अधिक यश लाभू शकते असा यजमानांचा होरा आहे.

नागपूर वन डेसाठीचे अंतिम संघ यातून निवडले जातील
हिंदुस्थान – विराट कोहली( कर्णधार ) ,शिखर धवन, रोहित शर्मा ,अंबाती रायुडू ,महेंद्रसिंग धोनी ( यष्टीरक्षक) ,केदार जाधव ,विजय शंकर ,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी ,कुलदीप यादव ,युजवेंद्र चहल ,रिषभ पंत ,सिद्धार्थ कौल ,के एल राहुल ,रवींद्र जाडेजा.

ऑस्ट्रेलिया – एरॉन फिंच ( कर्णधार ),डी,आर्सी शॉर्ट,शॉन मार्श ,मार्क्यूस स्टोइनीस ,उस्मान ख्वाजा ,अॅलेक्स कॅरी ,पीटर हॅंड्सकॉम्ब ,अष्टोन टर्नर,ऍडम झम्पा,जेसन बेहेरेंन्ड्रोफ्,झाये रिचर्डसन ,पॅट कमिन्स ,अँड्रू टाय ,नाथन कॉल्टर नीले,नाथन लिऑन.