अर्जेंटिनाला बदला घेण्याची संधी, कोपा अमेरिका स्पर्धेचा ड्रॉ जाहीर

दक्षिण अमेरिकेतील संघांचा वर्ल्ड कप असलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. दक्षिण अमेरिकेतील 10 संघांसह एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेत असेल. अमेरिकेत पार पडलेल्या ड्रॉच्या कार्यक्रमात अर्जेंटिनाला चिलीविरुद्ध 2016 साली साखळीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे. जगज्जेत्या अर्जेंटिनाची सलामीची लढत 20 जूनला अटलांटा येथे कॅनडा किंवा त्रिनिदाद आणि टोबॅगोशी यापैकी एका संघाशी होईल. ही 48 वी स्पर्धा यंदा 20 जून ते 14 जुलैदरम्यान खेळली जाणार आहे.

अर्जेंटिना आणि चिली यांच्यात 25 जूनला सामना होईल. त्यामुळे 2016 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला या सामन्यात अर्जेंटिना घेऊ शकते. 29 जून रोजी अर्जेंटिनाचा शेवटचा साखळी सामना मियामी येथे पेरूविरुद्ध होणार आहे.

इतर गटांमध्ये मेक्सिको गट ‘ब’ मध्ये इक्वाडोर, व्हॅनेझुएला आणि जमैका यांच्याशी स्पर्धा करणार आहे, तर ‘क’ गटामध्ये अमेरिकेचा सामना उरुग्वे, पनामा आणि बोलिव्हिया यांच्याशी होणार आहे. ‘ड’ गटामध्ये ब्राझील त्यांचा सामना कोलंबिया, पॅराग्वे आणि कोस्टारिका किंवा होंडुरास यांच्याशी होणार आहे. ब्राझील 24 जून रोजी कोस्टारिका किंवा होंडुरासविरुद्ध कॅलिफोर्निया येथे पहिला सामना खेळेल. त्यानंतर 28 जून रोजी पॅराग्वे आणि 2 जुलै रोजी कोलंबिया यांच्याविरुद्ध त्यांची लढत असेल.

आगामी कोपा अमेरिका स्पर्धेकडे उत्तर अमेरिकेत 2026 मध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेची चाचणी स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे. कोपा अमेरिका स्पर्धेसाठी 14 स्टेडियम वापरण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 जुलै रोजी होणार आहेत, तर स्पर्धेचा अंतिम सामना 14 जुलै रोजी मियामी येथे होणार आहे.

कोपा अमेरिका स्पर्धेसाठीचे गट
‘अ’ गट : अर्जेंटिना, पेरू, चिली, कॅनडा किंवा त्रिनिदाद आणि टोबॅगो.
‘ब’ गट : मेक्सिको, इक्वाडोर, व्हेनेझुएला, जमैका
‘क’ गट : अमेरिका, उरुग्वे, पनामा, बोलिव्हिया
‘ड’ गट : ब्राझील, कोलंबिया, पॅराग्वे, कोस्टारिका किंवा होंडुरास