
सामना ऑनलाईन । सेण्ट पीटर्सबर्ग
उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी खेळताना कोणताही संघ उत्सुक नसतो. त्यामुळे तेवढय़ा ईर्षेने कोणताही संघ मैदानात उतरतो का, हाही यक्षप्रश्नच! पण तरीही देशासाठी खेळताना मैदानात जिवाचे रान करावेच लागते हा भाग वेगळा. तसेच स्पर्धेचा शेवटही गोड करायचा असतो. असाच काहीसा प्रसंग गॅरेथ साऊथगेटच्या इंग्लंड व रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या बेल्जियम संघासमोर उभा राहिला आहे. इंग्लंड व बेल्जियम यांच्यामध्ये उद्या सेण्ट पीटर्सबर्ग येथे तिसऱया स्थानासाठी लढत रंगेल. यावेळी उपांत्य फेरीतील अपयश मागे सारून दोन्ही संघ नव्या जोमाने फुटबॉलच्या रणांगणात उतरतील यात शंका नाही.
केन – लुकाकूमध्ये झुंज
इंग्लंड व बेल्जियम यांच्यामधील लढत हॅरी केन व रोमेलू लुकाकू यांच्यासाठी ओळखली जाणार आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने आतापर्यंत सहा गोल करीत गोल्डन बूटसाठी आपली दावेदारी निश्चित केली असून त्याच्या पाठोपाठ रोमेलू लुकाकू याने चार गोल करीत आपणही त्या रेसमध्ये आहोत हे दाखवून दिले आहे. या दोन खेळाडूंमध्ये ही रेस कोण जिंकतोय यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
… तर रोनाल्डोची बरोबरी
हॅरी केनने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सहा गोल केले आहेत. त्याने अखेरच्या लढतीत आणखी दोन गोल केले, तर त्याला ब्राझीलचा महान खेळाडू रोनाल्डोच्या वर्ल्ड कपमधील गोलची बरोबरी करता येणार आहे. ब्राझीलने २००२ सालामध्ये पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची करामत केली होती. त्या वर्ल्ड कपमध्ये एकटय़ा रोनाल्डोने आठ गोल केले होते. हॅरी केनने दोन गोल केल्यास त्यालाही एका वर्ल्ड कपमध्ये आठ गोल करता येणार आहेत. तसेच १९७८ सालापासून रोनाल्डो वगळता एकाही खेळाडूला एका वर्ल्ड कपमध्ये सहापेक्षा जास्त गोल करता आलेले नाहीत. १९७४ साली पोलंडच्या जी. लॅटो याने सात गोल केले होते. दरम्यान, एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम फ्रान्सच्या जस्ट फोण्टेन याच्या नावावर आहे. त्याने १९५८ साली १३ गोल केले होते.
सलग नवव्यांदा युरोपियन देशाने पटकावला तिसरा क्रमांकइंग्लंड व बेल्जियम यांच्यामध्ये तिसऱया स्थानासाठी लढत होणार आहे. यावेळी हे दोन्ही देश युरोप खंडातील आहेत. त्यामुळे जेतेपदासह तिसरा क्रमांकही युरोप खंडातील देशाचाच लागणार आहे. यावेळी सलग नवव्या वर्ल्ड कपमध्ये तिसरा क्रमांक युरोपियन देशाने पटकावलाय हे विशेष. याआधी लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलने १९७८ साली इटलीला हरवत तिसऱया स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर मात्र एकाही युरोप खंडाबाहेरील देशाला अशी करामत करता आलेली नाही.
इंग्लंड वि. बेल्जियम, सेण्ट पीटर्सबर्ग
सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर रात्री ७.३० वाजता.




























































