
तुमचा शानदार खेळ आणि तुमची जिगर पाहता तुम्ही यंदा पुन्हा अंडर 19 विश्वचषकाचे खरे हकदार आहात. तुम्ही असेच निडरपणे अंतिम लढतीत इंग्लंड संघाविरुद्ध खेळा, विजय तुमचाच आहे अशा शब्दांत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडीजमधील अंडर 19 विश्वचषकात धडाकेबाज खेळ करणाऱया हिंदुस्थानच्या छोटय़ा शेरांचे मनोधैर्य वाढवले आहे. तर विराट भय्याच्या मोलाच्या टिप्स आमच्यासाठी बहुमूल्य आहेत, असे सांगत युवा हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी देशासाठी पाचव्यांदा युवा विश्वचषक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. युवा टीम इंडिया उद्या अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड स्टेडियमवरील अंतिम लढतीत इंग्लंड संघाला भिडणार आहे. इंग्लंड संघाने 24 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारल्याने हिंदुस्थानी शेरांचे मनोधैर्य प्रचंड उंचावलेले आहे.
इंग्लंड संघाने 24 वर्षांनंतर प्रथमच अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. अंतिम सामन्यात इंग्लंडचा कसा पराभव करायचा आणि विक्रमी पाचवे विजेतेपद कसे मिळवायचे याबद्दल टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने छोटय़ा उस्तादांना काही टिप्स दिल्या आहेत. विराटने हिंदुस्थानच्या या ज्युनिअर खेळाडूंना टिप्स दिल्याची गोष्ट संघातील खेळाडू कौशल तांबेच्या इस्टाग्राम स्टेटसवरून लक्षात आली आहे . या स्टेटसमध्ये विराटने 19 वर्षांखालील संघाला व्हिडीओ कॉल करून काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कौशलच्या स्टेटसमध्ये विराटने सर्व खेळाडूंना व्हिडीओ कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानी युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सलग चौथ्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले.
स्पर्धेचा इतिहास टीम इंडियाच्या बाजूने
अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात युवा टीम इंडियाच 8 अंतिम लढतींपैकी 4 जिंकून सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे. 14 स्पर्धांपैकी 8 स्पर्धांत हिंदुस्थानी युवा संघाने अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. त्यात 4 वेळा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरून हिंदुस्थानी युवकांनी स्पर्धेवर आपले मोठे वर्चस्व दाखवून दिले आहे. जगाला क्रिकेट शिकवणाऱया इंग्लंड संघाला मात्र 24 वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली आहे. इंग्लंडला 1998मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले आहे. त्यामुळे आपल्या पाचव्या विक्रमी जेतेपदासाठी मैदानात उतरणाऱया युवा टीम इंडियाचे पारडे उद्या निश्चितच जड असणार आहे.
हिंदुस्थानी फिरकीपुढे इंग्लंडची कसोटी
यंदाच्या स्पर्धेत हिंदुस्थानचे युवा फिरकीवर विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे यांनी प्रतिस्पर्धी संघांना आपल्या फिरकीवर चांगलेच नाचवले आहे. ओस्तवालने स्पर्धेत 12 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी फिरकीपुढे इंग्लंडच्या युवा फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. त्यातच डावखुरा रविकुमार आणि मराठमोळा राजवर्धन हंगरगेकर या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठवण्याचा पराक्रम केला आहे. फलंदाजीत तर कर्णधार यश धूल, उपकर्णधार रशीद शेख, सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग आणि निशांत सिंधू हे फलंदाज जबर फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे युवा टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करीत पाचव्या विक्रमी वेळा पुन्हा युवा विश्वचषक जिंकणार, असा विश्वास हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना आहे.
प्रतिस्पर्धी संघ
हिंदुस्थानः यश धूल (कर्णधार ), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सोद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गर्व सांगवान, दिनेश बाना, आराध्य यादव, राज बावा, वासू वत्स आणि रविकुमार.
इंग्लंडः टॉम प्रेस्ट (कर्णधार),जॉर्ज बेल, जोशुआ बोयडेन, ऍलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल, जॉर्ज थॉमस, थॉमस अस्पिनवाल, नॅथन बार्नवेल, जेकॉब बेथेल, जेम्स कॉल्स, विल्यम लक्स्टन, जेम्स रेव, फतेह सिंग, बेंजामिन क्लीफ.




























































