हिंदुस्थानला जमलं नाही ते स्पेनने करून दाखवलं!

हिंदुस्थानी संघासह अनेक दादा संघांना जे जमलं नाही ते स्पेनच्या क्रिकेट संघाने करून दाखवलंय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग 14 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम या युरोपमधील क्रिकेट संघाने केलाय. स्पेन क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कप उपप्रादेशिक युरोप पात्रता गटात ग्रीस क्रिकेट संघाचा 7 गडी राखून पराभव करत इतिहास रचला आहे.

यापूर्वी सर्वाधिक 13-13 टी-20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम संयुक्तपणे मलेशिया आणि बर्म्युडा या देशांच्या नावावर होता, मात्र आता स्पेनने सलग 14 सामने जिंकून त्यांचा विक्रम मोडीत काढलाय. स्पॅनिश क्रिकेट संघाने 25 फेब्रुवारी 2023 पासून सलग 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. विश्वविक्रम करण्यासाठी स्पेनने आयल ऑफ मॅन, जर्सी, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक आणि ग्रीस या संघांना पराभूत केले आहे. दुसरीकडे हिंदुस्थानी संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 12 सामने जिंकले आहेत.