विश्वचषक नेमबाजी स्पर्धा; ऐश्वर्य, चिंकी यांचा ‘सुवर्ण’ वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारचा दिवस भोपाळच्या नेमबाजांनी गाजवला. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर व चिंकी यादव यांनी वेगवेगळ्या प्रकारांत अचूक वेध साधत हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. विश्वचषक स्पर्धेत ऐश्वर्य प्रतापचे कारकीर्दीतील हे पहिलेच सुवर्णपदक होय. पदकतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हिंदुस्थानच्या खात्यात आतापर्यंत 9 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कास्य अशी एकूण 18 पदके जमा आहेत.

ऐश्वर्य प्रतापने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली, तर चिंकी यादवने महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात सोनेरी यश संपादन केले. महान नेमबाज संजीव राजपूत सहाव्या स्थानी, तर नीरज कुमार आठव्या स्थानी राहिला.

20 वर्षीय ऐश्वर्यचा प्रताप

20 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या फायनलमध्ये 462.5 गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. हंगेरीच्या इस्तवान पेनीने 461.6 गुणांसह रौप्य, तर डेन्मार्कच्या स्टीफन ओल्सनने 450.9 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.

हिंदुस्थानी महिलांचाच बोलबाला

महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात तिनही पदके हिंदुस्थानी नेमबाजांनीच जिंकली. चिंकीच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राच्या राही सरनोबतने रौप्य, तर हरयाणाच्या मनू भाकरने कास्यपदकाची कमाई केली. या प्रकारात चिंकीने आधीच ऑलिम्पक कोटा मिळविलेला आहे.

पात्रता फेरीत अव्वल, पण…

संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या पात्रता फेरीत 1172 गुणांसह अव्वल स्थान पटकाविले होते, मात्र अंतिम फेरीत 1165 गुणांसह त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऐश्वर्य प्रतापने 2019च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत या प्रकारात कास्यपदकाची कमाई केली होती. त्यावेळीच त्याने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.