WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप पुढे ढकलली

फोटो - बीसीसीआय

आयपीएलच्या आयोजनासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची म्हणजेच WTC ची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सामना आता 18 जूनपासून खेळवला जाणार आहे.

हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिका- स्टोक्स, आर्चर, बर्न्स हिंदुस्थानात दाखल

पूर्वी हा सामना 10 जून रोजी लॉर्डस इथे खेळवण्यात येणार होता. 10 जूनच्या आसपासच आयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास आयपीएल आणि WTC च्या अंतिम सामन्यात खेळणारे क्रिकेटपटू इंडीयन प्रिमिअर लीग स्पर्धेनंतर क्वारंटाईन झाले असते, ज्यामुळे त्यांना कसोटी सामना खेळणं हे जवळपास अशक्य होतं. याच कारणामुळे हा सामना पुढे ढकलण्याचं ठरल्याचं सांगण्यात आलं आहे.

इंग्लंडचे घवघवीत यश, दुसऱया कसोटीत श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय

जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यासाठी 3 दिग्गज संघांमध्ये सध्या चुरस पाहायला मिळत आहे. हिंदुस्थान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ अंतिम फेरीत धडक मारण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या सामन्यासाठीच्या क्रमवारीत सध्या हिंदुस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे.

हिंदुस्थानी संघाचे 430 गुण असून दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे. या संघाकडे 420 गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांच्याकडे 332 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानला लोळवून पहिलं स्थान बळकट करण्याची स्वप्ने पाहात होता. मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या जिगरबाज संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच खेळपट्टीवर अक्षरश: खडे चारले. या विजयामुळे हिंदुस्थानी संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेताना गुण तालिकेत न्यूझीलंडपेक्षा जास्त गुण मिळवले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा सामना हरलो असतो तर काय झाले असते ?

हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंडच्या संघाला चीतपट करण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ‘अखेरचा कसोटी सामना हिंदुस्थानी संघ जिंकणं अशक्य आहे, त्यांनी सामना अनिर्णित राखला तरीही तो चमत्कार असेल’ असं ऑस्ट्रेलियाचे पाठीराखे म्हणत होते. हिंदुस्थानी संघाने सामना जिंकत या सगळ्यांना सणसणीत चपराक हाणली होती. मात्र जर हा सामना अनिर्णित राहिला असता तर हिंदुस्थानी संघासाठी समीकरणे अवघड झाली असती.

सामना अनिर्णित राहिला असता तर हिंदुस्थानला इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागला असता आणि एक लढत ड्रॉ ठेवावी लागली असती. जर हा सामना हिंदुस्थानी संघाने गमावला असता तर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चारही लढतींमध्ये विजय मिळवावा लागला असता.हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकल्याने आता त्यांना इंग्लंडविरुद्धच्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. असं झाल्यास हिंदुस्थानी संघ या कसोटी अजिंक्यपदासाठीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर अबाधित राहील.

आपली प्रतिक्रिया द्या