
वरळी येथे अपघात केल्याची मिहीर शहा याने कबुली दिल्यानंतर वरळी पोलीस आता सबळ पुरावे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. अपघातानंतर आरोपींनी कारची काढलेली नंबर प्लेट तसेच मिहीरने अपघात करण्यापूर्वी बियर पिऊन फेकलेले टिन हस्तगत करण्याबरोबर त्याने पळून जाताना कुठे केस कापले व दाढी केली त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
रविवारी पहाटे वरळीच्या सी.जे. हाऊस येथे अपघात करून कावेरी नाखवा यांना निर्दयीपणे फरफटत नेणाऱया मिहीरने राजऋषी बिडावतच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी कारची नंबर प्लेट काढून ती फेकली. मग कारवरील एका पक्षाचे चिन्ह असलेले स्टिकर खरवडून काढले. त्यानंतर पळून जाताना मिहीरने आपली ओळख बदलण्याची आयडिया केली. त्याने रस्त्यात एके ठिकाणी दाढी केली आणि केस कापले. त्यामुळे पोलीस ती नंबर प्लेट, बियरच्या टिनचा शोध घेत असून मिहीरने केस व दाढी केली तिथला तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण इतके दिवस होऊनही पोलिसांना या बाबी अद्यापपर्यंत कशा मिळाल्या नाहीत? पोलीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा का करत आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शिवाय सर्व चित्र स्पष्ट असतानाही या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होणार की नाही असेही विचारले जात आहे.