
वरळी येथील वेन्यू व्हिस्ता इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून रविवारी एकाचा मृत्यू झाला. लिफ्टमध्येच अडकल्याची माहिती इमारतीतील सुरक्षारक्षकाला मिळताच लिफ्ट खाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्ट खाली येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. वरळी येथील पोचखानावाला रोड, ओम रतन इमारतीजवळील वेन्यू व्हिस्ता इमारतीची लिफ्ट रविवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमाराला बंद पडली. त्यात इमारतीत राहणारे विशाल मेवानी (46) हे अडकून पडले. ही माहिती इमारतीच्या सुरक्षारक्षकाला समजताच त्याने लिफ्ट खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्ट मध्येच अडकून पडली आणि मेवानी गुदमरून बेशुद्ध पडले. त्यांना ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




























































