
सामना प्रतिनिधी । राहुरी
खरीप हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीचे संकट उभे राहिल्याने राहुरीचा शेतकरी चांगला धास्तावला आहे. तालुका कृषी विभागाचा सुस्त कारभार हे संकट उभे राहण्यास कारणीभूत ठरला आहे.
आद्रा नक्षत्रातील पावसावर राहुरी भागात खरीप हंगामातील मका पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. चार दिवसापुर्वी पुष्य नक्षत्रातील पावसाने हजेरी लावल्याने या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र पाण्याचे संकट टळले असले तरी लष्करी अळीचे नवे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी तालुका कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची गरज असताना मात्र प्रादुर्भाव झाल्यानंतर अधिकाऱ्याने किड रोखण्यासाठी लागणाऱ्या माहितीची टिमकी वाजविण्यास सुरवात केली आहे. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरला आहे.९६ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या राहुरी तालुक्यातील पूर्व भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावे दत्तक घेणार असल्याचे कृषी अधिकाऱ्याने जाहीर केले आहे. तर अळीचा बंदोबस्त करण्यासाठी लागणारे सापळे पुरविण्याची जबाबदारी कृषी केंद्रावर टाकण्यात आली आहे. सहा महिन्यापुर्वी राहुरी तालुक्यात ऊसाच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणारे पिंजरे दुप्पट पैसे देवुन खरेदी करण्याची दुदैवी वेळ शेतकऱ्यांवर आली होती. दरम्यान, अनेक ठिकाणी पिंजरे लावुन ही हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखला गेला नव्हता.
या पाठोपाठ जुलै महिन्यात खरीप हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांना अचुक मार्गदर्शन वेळेवर करण्याबाबत तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासीनता यास कारणीभूत ठरली आहे.

























































