भादा परिसरात सोयाबीन उंट अळीने केले फस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भादा परिसरातील यंदाच्या खरीप हंगामातील एकमेव असलेल्या सोयाबीन पिकाला सध्या किडी रोगांनी घेरले आहे. सोयाबीन पिकाच्या पानांची चाळण करून सोयाबीनच्या शेंगाचा भुगा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यंदा पावसाअभावी खरिपातील पेरण्या मुळातच उशिरा झाल्या असून जुलै महिन्यात पडलेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन करण्यावर भर दिल्याने सोयाबीनच्या क्षेत्रावर वाढ झाली मात्र या सोयाबीन पिकावर सध्या दुहेरी संकट आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

सोयाबीन या पिकाला वाचवण्यासाठी मोठ्या कष्टाचे प्रयत्न करूनही रोग आटोक्यात येत नाही. या पिकावर मोठ्या प्रमाणावर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची पाने व शेंगा यांचा भुगा होत आहे. वास्तविक पाहता या किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी महागड्या किटकनाशकाचा प्रयोग करूनही यांचा प्रभाव व प्रादुर्भाव कमी होत नसल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर या भागात दिसून येत आहे. कृषी विभागाशी संपर्क साधला असताना ज्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे त्यांनीही मका जनावरांना चालू नये असा संदेश दिला आहे. मात्र एकंदरीत दुष्काळात कशाबशा रिमझिम पावसाने तारलेल्या पिकावर मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव असल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.