WPL 2024 – धोनी स्टाईल सिक्स, मुंबईचा अखेरच्या चेंडूवर थरारक विजय

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाची शुक्रवारी सुरुवात झाली. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सलामीचा सामना रंगला. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानात रंगलेला हा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकत मुंबईने विजयी सलामी दिली.

172 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी अखेरच्या षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर पूजा वस्त्रकर बाद झाली. दुसऱ्या चेंडूवर अमरजित कौरने 2 धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एक धाव घेत स्ट्राईक कॅप्तन हरमनप्रीत कौरकडे आली. चौथ्या चेंडूवर तिने चौकार ठोकल्याने समीकरण 2 चेंडू 5 धावा असे झाले. मात्र पाचव्या चेंडूवर हरमन आउट झाली. अखेर एस. सजना हिने कॅप्सीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत संघाला 4 विकेट्सने थरारक विजय मिळवून दिला.

दरम्यान, मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 55 धावांची वेगवान खेळी केली, तर यास्तिका भाटिाने 45 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.