
मोदी सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अभियान सुरू केलं आहे. पण, प्रत्यक्षात परिस्थिती विरोधाभासी दिसत असून या अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर असलेली पैलवान महिलाच घरगुती हिंसाचाराची बळी ठरल्याचं वृत्त आहे. या महिलेचं नाव रानी राणा असं असून ती आंतरराष्ट्रीय पैलवान आहे. राणा यांनी आपला नवरा आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
रानी राणा यांचा विवाह 2020मध्ये झाला आहे. लग्नाच्या सहा महिन्यांपासूनच त्यांना अडीच कोटी रुपये हुंडा आणावा यासाठी त्यांचा छळ करायला सुरुवात केली. हळू हळू हुंड्यासाठी त्यांचा मानसिक आणि मग शारीरिक छळ करायला सुरुवात केली. अडीच कोटी रुपये हुंडा द्यावा अन्यथा घरातून बाहेर पडावं, असं आपल्याला सांगण्यात आलं. तसंच हुंडा न दिल्याने जनावरांहून भीषण मारहाण होत असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
30 मे रोजी ही मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या खेळावर आपण लक्ष केंद्रीत करू शकत नाही. तसंच, सासरची मंडळी आणि नवरा छळ करून आपली खेळातील कारकिर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही राणा यांचं म्हणणं आहे. धक्कादायक बाब म्हणजे रानी राणा या बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

























































