राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली; 21 डिसेंबरचा मुहूर्त, त्याच दिवशी निकाल

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) निवडणुकीची तारीख ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर आता ‘डब्लूएफआय’च्या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरचा मुहूर्त ठरला असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘डब्लूएफआय’च्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा हरयाणा व पंजाब उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. आता तारीखही जाहीर झाली असून 21 डिसेंबर रोजी दुपारी 11 ते 1 या दरम्यान मतदान, दीड वाजता मतमोजणी आणि मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाईल.

उच्च न्यायालयाने 12 ऑगस्टला हरयाणा कुस्ती महासंघाच्या (एचडब्लूए) याचिकेवरून ‘डब्लूएफआय’च्या निवडणूकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर वेळेत निवडणुका न घेतल्याने यूनायटेड वल्र्ड रेसलिंगनेही (यूडब्लूडब्लू) ‘डब्लूएफआय’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

उच्च न्यायालयाने का घातली होती बंदी?

गतवर्षी 12 ऑगस्टला हिंदुस्थान ऑलिम्पिक समितीच्या देखरेखीखाली राष्ट्रीय कुस्ती महासंघाची (डब्लूएफआय) निवडणूक होणार होती, मात्र निवडणुकीच्या आधी हरयाणा कुस्ती महासंघाच्या याचिकेवर हरयाणा व पंजाब उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली. डब्लूएफआयने हरयाणा कुस्ती महासंघाच्या जागेवर दुसऱ्याच संघटनेला निवडणुकीत भाग घेण्यास परवानगी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. आमची संघटना हरयाणा ऑलिम्पिक महासंघाशी संलग्न असल्याचे हरयाणा कुस्ती महासंघाचे म्हणणे मान्य करीत उच्च न्यायालयाने ‘डब्लूएफआय’च्या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.

निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरले होते

न्यायालयाकडून स्थगिती येण्यापूर्वी डब्लूएफआयच्या निवडणूकीसाठी उमेदवार रिंगणार उतरले होते. अध्यक्षपदासाठी 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अनिता श्योराण व संजय सिंह यांच्यात लढत होणार होती. संजय सिंह हे बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होते, तर अनिता श्योराणने महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्याविरुद्ध साक्ष दिली होती. बृजभूषण यांच्याविरुद्ध आंदोलन करणाJd/e कुस्तीपटूंचे अनिता श्योराण यांना समर्थन होते.