
सामना ऑनलाईन । मुंबई
अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळालं आहे. इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका लक्षात घेत निवड समितीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २००७मध्ये हिंदु्स्थान इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता त्यावेळी तेथे कार्तिकने चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी कार्तिकने मालिकेत तीन अर्धशतक झळकावले होते.
कार्तिकची २००७ ची कामगिरी लक्षात घेत एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वात निवड समिती कार्तिकचा आगामी इंग्लंड दौऱ्यात संघात समावेश करण्याच्या विचारात आहे. कार्तिकने २०१०मध्ये मागील कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळला होता. मात्र कार्तिकने फर्स्ट क्लास करिअरमध्ये २७ शतके झळकावत ९०००हून जास्त धावा ठोकल्या आहेत. तर हिंदुस्थानकडून खेळताना कार्तिकने २३ कसोटी सामन्यात ७ अर्धशतकांसह १००० धावा केल्या आहेत.
वृद्धिमान साहा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये १५ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात साहाला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या के एल राहुलनेही कसोटी सामन्यात विकेटकीपर म्हणून जबाबदारी सांभाळू शकतो असं म्हटलं होतं.



























































