लेखकाच्या घरात…‘मी’पण जपणारी लेखिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

नीरजा… कवयित्री… लेखिका… याहून खूप महत्त्वाचे… एक अत्यंत संवेदनक्षम स्त्री… मुंबईतल्या मध्यमवर्गीय घरात राहून बारीकसारीक गोष्टीत ‘स्वत्व’ शोधणारी….

काय असते जात बाईची

आणि कोणता असतो धर्म

बदलतो का वेदनेचा स्तर

जात बदलली तर …

असं वास्तवाला भेदणाऱया शब्दांचं सामर्थ्य असणाऱया नीरजाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेले तेव्हा मला पत्ता शोधायला त्रास होऊ नये यासाठी त्यांचे यजमान राजन लिफ्टने निघतच होते. घरात गेल्या गेल्या नीरजाताई म्हणाल्या, ‘‘डोसे केलेत. राजन मस्त करतो ते. कुरकुरीत, गरमागरम…’’ खूप आग्रहाने राजन सरांनी आणलेले कुरकुरीत डोसे, नीरजाताईंनी केलेली बटाटय़ाची भाजी, सांबार आणि सोबत शेवयाची खीर असा मस्त पाहुणचार स्वीकारत आमच्या गप्पा सुरू झाल्या. जाणवत होतं की, ते घर त्या दोघांचं आहे.

नीरजाताई म्हणाल्या, ‘‘स्त्रीला स्वतःचं घर नसतं असं सर्वसाधारणपणे आम्ही स्त्री वादी लेखिका म्हणत असतो, पण माझ्या बाबतीत ते खरं नाही. माझा जन्म वरळी-कोळीवाडय़ातला. दहा बाय दहाच्या चाळीतला. नंतर मॉण्टेसरी ते बीएपर्यंत घाटकोपरला महानगरपालिकेच्या चाळीत राहिलो आम्ही. दोन खोल्यांचं घर होते ते. त्या काळात सेल्फ-कंटेंट्ड. आजूबाजूला छानशी हिरवळ. डोंगरावर होतं ते घर. माझा जन्म झाला आणि वडील मनमाडला गेले. ते प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य झाले. घाटकोपरच्या घराने मला समृद्ध बालपण दिले. तिथली लायब्ररी, चाळीतला माहौल खूप महत्त्वाचे ठरले माझ्यासाठी. नारायण सुर्वे म्हणायचे तशी माणसं वाचायला शिकले मी तिथे. फ्लॅट संस्कृतीत ते झालं नसतं. मी लिहिलेल्या ‘काकस्पर्श’मधला पाऊस, घर घाटकोपरच्या चाळीतलं आहे. तिथला पाऊस रुतून बसलाय माझ्या मनात. जिन्यावरून दुडदुडत जाणारा. आई, आजी आणि आम्ही चार बहिणी राहायचो तिथे आणि बाबा एकटेच मनमाडला. महिन्यातून एखादी फेरी व्हायची त्यांची मुंबईला. त्यावेळी ते चांगली चांगली नाटकं दाखवायचे. बाबासाहेब पुरंदरेंची आठ दिवसांची व्याख्यानमाला ऐकली होती मी त्यांच्याबरोबर चौथीत असताना. दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही मनमाडला जायचो. त्या घरातच मी लिहिती झाले. माझे वडील सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर म. सू. पाटील. त्यांच्यामुळे आमच्या घरात बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, ग्रेस, पु. शि. रेगे असे दिग्गज यायचे. मी त्यांच्या चर्चा ऐकायचे. त्याच घरात मी माझी पहिली कविता आणि कथा लिहिली. माझ्या पहिल्या पुस्तकाची अर्पणपत्रिका ‘ज्यांनी खाऊ म्हणून माझ्या हातात पुस्तक ठेवलं त्या माझ्या बाबांना’ अशीच आहे. इंग्रजी घेऊन बीए आणि नंतर एमए केलं मी.

त्या म्हणाल्या, ‘‘मुलगी जन्माला येण्यापासूनच तिच्याकडे दुय्यमत्व येतं. सुदैवानं माझ्या बाबतीत लग्नाआधी ते नव्हतं आणि लग्नानंतरही नव्हतं, पण स्त्री फक्त घरात नाही, तर समाजातही वावरत असते. तिथे तिची आयडेंटिटी नाकारली जाते आणि अशा अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे स्त्री वाद. खरे तर अन्यायाविरोधात नुसतं बोलणं नाही, तर त्याविरोधात बंडखोरी करायला माझ्या घरात मला शिकवले. आम्ही चार बहिणी. आम्हाला घेऊन घाटकोपरला राहणारी आमची आई. चार मुलीच. मुलगा नाही म्हणून तिला बरंच ऐकून घ्यावं लागले, पण माझे बाबा प्रत्यक्ष तिच्याबरोबर नसले तरी विचारांनी सतत बरोबर होते तिच्या. स्त्री वादाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई. ती तिला हवं तसंच जगली. आर्थिक व्यवहार तिच्या हातात होते. कारण ती सगळं कुटुंब सांभाळत होती. ‘माझी नोकरी मनमाडला आहे. तेव्हा तू तुझी नोकरी सोडून इथे राहायला ये’, असं नाही वडिलांनी सांगितलं तिला. मनमाडसारख्या ठिकाणापेक्षा मुंबईत मुलींना वाढवायला योग्य वातावरण आहे हे त्या दोघांनाही माहीत होतं. महानगरात स्वतःला व्यक्त करण्याचं मिळणारं स्वातंत्र्य छोटय़ा गावात मिळत नाही हे त्यांचं मत होतं. घरं दोन होती, पण त्याचा तोल दोघांनी छान राखला होता.’’

स्वतंत्रपणे विचार करायचं भान मला वाचनामुळे आलं. आईवडील स्वतंत्र विचारसरणीचे होते, पण काका आणि काकू पारंपरिक. हातात बांगडी घातली नाही की, ते ओरडायचे आणि मग मी बंडखोरी करत मुद्दामच ती घालायचे नाही. आंधळेपणानं कुठलीही परंपरा न पाळण्याची बंडखोरी रुजली होती मनात. माझ्या मोठय़ा बहिणीनं इंटरकास्ट मॅरेज केलं. त्याला बाबांनी सहज परवानगी दिली. मामा आणि काका यांना प्रश्न पडला होता की, आपल्यातला कोणी मिळाला नाही का? त्यावेळी मी ठरवलं होतं की, दलित मुलाशीच लग्न करायचं. मनाला न पटणाऱया गोष्टीची चर्चा मग पुढे कथांमधून दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केली मी.’’ आत्मभान ते विश्वभान खूप महत्त्वाचं असं नीरजाताईंना वाटतं. परकाया प्रवेश करून दुसऱयाच्या वेदनेवर लिखाण करताना तितक्याच वेदनादायी अनुभवातून जात त्या लिहितात. स्वतःचं अस्तित्व विसरून जगणाऱया स्त्रिया त्या पाहतात तेव्हा त्या स्त्रियांना त्याची जाणीवच नसते याचं त्यांना अधिक वाईट वाटतं. दुसऱया पुस्तकाची अर्पणपत्रिका त्यांनी आईला अर्पण केली आहे. त्यात लिहिलं आहे ‘माझ्या पदरावर, उडणारा पक्षी तू रेखाटलास. त्यामुळे त्या उडणाऱया पक्ष्याच्या नजरेतून मी संपूर्ण जगाकडे पाहू शकले.’ नीरजाताई सांगत होत्या, ‘‘आमचं अरेंज्ड मॅरेज. सासरच्यांना पत्रिका पाहिजे होती. आमच्याकडे नव्हती ती. माझी जन्मवेळ विचारून त्यांनीच ती पत्रिका बनवली. त्यात मला मंगळ असल्याचं कळलं आणि मग माझ्या नवऱयानं -राजननं- स्टँड घेतला.’’ तो कोणता हे राजन सरांनी स्वतःच सांगितलं. ते म्हणाले, ‘‘मुलगी पाहून होकार दिल्यावर पत्रिकेमुळे मी तिला नकार देणार नाही. माझ्या ताईलाही मंगळ. तिचं लग्न जमवताना जो त्रास झाला होता, त्याचीही आठवण करून दिली मी माझ्या घरच्यांना. दुसरी मुलगीच बघणार नाही असं सांगितलं मी घरच्यांना. अखेरीस तयार झाले ते. अबोला धरला होता मी त्यासाठी…आणि झालं लग्न.’’

नीरजाताई म्हणाल्या, ‘‘त्यावेळी आमची जी मैत्री झाली, ती आजतागायत आहे. सासरी वातावरण परंपरा पाळणारं. सासू, सासरे, दीर आणि आम्ही सगळे एकत्र घाटकोपरला राहायचो. दोन वर्षांनी या घरात आलो आम्ही. परंपरा पाळणारी होती तरी माणसं चांगली होती ती. त्यामुळे त्यांना तोडून वगैरे नाही आलो आम्ही, पण सुनेची भूमिका निभावताना लेखिका म्हणून माझी ओळख झाली नाही त्या घराला. म्हणजे लेखकाची एक आंतरिक गरज असते, लिहायला बसायची, ती निकड समजू शकत नव्हते ते, पण राजनला ते समजलं. म्हणून त्यानं घर घेतलं दुसरं.’’ राजन म्हणाले, ‘‘ मला आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकायची नव्हती, पण त्यांना सांभाळताना मला नीरजालाही स्पेस द्यायची होती, तिच्या लिखाणाची. आई म्हणजे माझा जीव की प्राण. कुठलीही गोष्ट करताना मी तिला नीट समजवून मगच केली. त्यामुळे संबंध तुटले नाहीत आमचे. उलट हे घर ज्या पद्धतीनं मी सजवलं, ते त्यांना खूप आवडलं. ते इथेही येऊन राहिले नंतर. मुळात आपली भावना प्रामाणिक असली ना, की मग सुरुवातीला नाही, तरी काही काळानं ती समोरच्यापर्यंत पोहोचते यावर माझा विश्वास आहे.’’ राजन सर हे सांगत होते तेव्हा नीरजाताई आणि त्यांच्या समजूतदार सहजीवनाचा गाभा लक्षात आला माझ्या.

नीरजाताई पुढे म्हणाल्या, ‘‘त्या काळात मी कविता लिहिल्या जास्त. कारण त्या लिहायला वेळ कमी लागायचा. माझं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा आले होते सगळे घरचे. कौतुक होतंच त्यांना, पण मी लिहीत होते ते त्यांचं विश्व नव्हतं. माझ्या नवऱयाला कळलं होतं ते. आता या घरात पाहुणे येतानाही माझ्या असाइनमेंटला प्रायोरिटी मिळते.’’ राजन म्हणाले, ‘‘मी जे काही करतो, केलं, ते करणं गरजेचंच आहे. कारण घर दोघांचं असतं. त्यामुळे माझ्या नोकरीला, त्यानिमित्तानं मी करत असणाऱया माझ्या व्यस्ततेला जसं नीरजा समजून घेते, तसंच मीही तिला समजून घ्यायला हवं ना…’’

नीरजा आणि राजन… दोघांच्या नावातली अक्षरंसुद्धा तीच. एकही कमी किंवा जास्त नाहीत उलटसुलट क्रमानं आलेली, कानामात्रेचा फरक असलेली, पण तीच आणि तेवढीच… आणि त्या दोघांचं सहजीवनदेखील तसंच. एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांना पूरक, तरीही दुसऱयासाठी जगताना स्वतःचं स्वत्व जपणारं, आत्मसन्मान जपताना दुसऱयाला समजून घेणारं… ‘रंगुनी रंगात साऱया रंग माझा वेगळा’ असं काहीसं…