पंड्या म्हणजे गंजलेली लोखंडी कुऱ्हाड

>>द्वारकानाथ संझगिरी

आयपीएल संपली. कोलकाता नाईट रायडर्सने त्यावर विजयाची मोहर उमटवली. हैदराबादच्या संघानेही जोरदार मुसंडी मारली. तळागाळातून थेट अंतिम सामन्यांपर्यंत. त्यांची संघाची निवड आणि डावपेचात्मक आखणी अप्रतिम होती. बरोबर तीच चूक मुंबई इंडियन्सने केली. कारण नसताना कर्णधार बदलला. कुणाची बुद्धिमत्ता देव जाणे. त्यांना वाटलं की, हार्दिक पंडय़ा ही सोन्याची कुऱहाड आहे. तिने प्रतिस्पर्धी संघाचे तुकडे होतील. झालं भलतंच. ‘कुऱहाडीचा दांडा गोतास काळ झाला,’ मुंबई संघाचे पाय कापले गेले. वर लक्षात आलं की, ती सोन्याची कुऱहाड नाही. गंजलेली लोखंडी कुऱहाड आहे आणि ती घेऊन आता आपण अमेरिकेला निघालोय.

जय जय शहावीर समर्थ!

कोलकात्याने सुनील नारायणला आघाडीला पाठविण्याचा डाव खेळला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. 24.75 कोटी देऊन खरेदी केलेला स्टार्क त्यांना योग्य वेळी फळाला आला. सुरुवातीला तो अपयशी ठरला, पण मोठय़ा स्टेजवर त्याने सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. जागतिक दर्जा तिथे दिसतो. बुमरा आणि स्टार्क हे कुठल्याही फॉरमॅटचे दादा वेगवान गोलंदाज आहेत. गौतम गंभीरने त्याची क्रिकेट बुद्धिमत्ता उत्तमपणे दाखवली. उगाच नाही शाहरुखने त्याच्यापुढे कोरा चेक ठेवला.

चंदू पंडितच्या हाताला परिसाचा स्पर्श आहे. त्याने आणि नायरने नव्या दमाच्या खेळाडूवर मेहनत घेतली आणि त्यांना मॅचविनर बनवलं.

श्रेयस अय्यर मुंबईचा, दोन प्रशिक्षक मुंबईचे, मालक मुंबईचा, कोलकाताच्या विजयात मुंबईचा हात मोठा आहे.
हैदराबादने पॉवर प्लेमधल्या षटकांचा इतिहास बदलला.

अभिषेक शर्मा आणि हेडने पॉवर प्लेचं गणितच बदललं. अंतिम सामन्यात ते स्टार्कने बिघडवलं. त्याने अभिषेक शर्माला टाकलेला चेंडू स्वप्नवत होता. अक्षरशः त्याने अभिषेकला फिरवलं. स्टार्क ही खरी सोनेरी कुऱहाड. योग्य वेळी त्याने घाव घातले आणि हैदराबादला हेड वर काढायला दिलं नाही.

गौतम गंभीर म्हणाला ते खोटं नाही. जे दोन संघ अंतिम सामन्यात खेळले त्यातला एकही खेळाडू टी-20 वर्ल्ड कपच्या हिंदुस्थान संघात नाही.

यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन या दोघांचा मला राग आला. कितीवेळा मोक्याच्या वेळी शॉट सिलेक्शन चुकावं? इथे टेम्परामेंटची परीक्षा होते. ते त्यांनी विराटकडून शिकावं. 37 व्या वर्षी विराटच्या फिटनेस, फॉर्म आणि जिंकण्याच्या जिद्दीने मला वेड लावलं. त्याच्यासाठी तरी आरसीबीने जिंकायला हवं होतं. काहीवेळा असं होतं. चांगल्या परफॉर्मन्स यशाच्या मखरीत बसत नाही.

बुमराचा कुठे बसला? किंवा गायकवाडच्या धावा? शेवटी एक जाणवलं योग्य संघ जिंकला आणि योग्य संघ अंतिम फेरीत शिरले. नियतीने न्याय केला.