‘उत्तर-पश्चिम’मुंबईमध्ये निष्ठावंतांची बाजू भक्कम

>>मंगेश दराडे

मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात निष्ठावंतांचीच बाजू भक्कम असल्याने महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात असलेले तरुण तडफदार हे. त्यांच्या विरोधात मिंधे गटात गेलेले रवींद्र वायकर उभे असल्याने कीर्तिकर यांना ही लढत सोपी जाणार असल्याचे चित्र आहे. यातच वायकर यांनी आपण नाइलाजाने मिंधे गटात गेल्याची जाहीर कबुलीच दिल्याने अमोल कीर्तिकर यांचा विजय आणखी सुकर झाला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि पश्चिम असे सहा मतदारसंघ येतात. गोरेगावमध्ये विद्या ठापूर, अंधेरीत अमित साटम आणि वर्सोव्यात भारती लव्हेकर हे भाजपचे आमदार आहेत. दिंडोशीत सुनील प्रभू, तर अंधेरी पूर्वेला ऋतुजा लटके या शिवसेनेच्या आमदार आहेत, तर जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी अलीकडेच मिंधे गटात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात 17 लाख 35 हजार मतदार आहेत. मराठी मतदारांची संख्या सर्वाधिक असून त्यांची मते निर्णायक ठरतील. तब्बल 21 उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघाने शिवसेनेला सलग दोन वेळा साथ दिली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे या वेळीही मतदार राजा गद्दारांना नाही तर निष्ठावंतांनाच साथ देतील अशी स्थिती आहे.

विकासकामांच्या जोरावर या मतदारसंघात शिवसेनेची मजबूत पकड आहे. अमोल कीर्तिकर यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला असून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षांत त्यांचा मतदारसंघाशी थेट संपर्प आहे. त्यामुळे येथील समस्यांची त्यांना जाणीव आहे. मार्चमध्येच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासूनच अमोल कीर्तिकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

मतदारसंघात मशालीचा झंझावात

अमोल कीर्तिकर यांचे सुसंस्पृत व्यक्तिमत्त्व आणि विनम्र स्वभाव सर्वांच्या परिचयाचा आहे. युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे केली असून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या 500 मुलींची लग्ने त्यांनी लावून दिली. सिनेट निवडणुकीतदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका होती. योगा सेंटर, जिम, चौपाटय़ा, ज्येष्ठ नागरिक कट्टा, रेल्वे स्टेशनसह प्रभागात ठिकठिकाणी भेटी देऊन अमोल कीर्तिकर नागरिकांशी संवाद साधत आहेत. नागरिकांकडूनदेखील त्यांचे जोरदार स्वागत होतेय. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत. एकंदरीत या मतदारसंघात मशालीचा झंझावात पाहायला मिळतोय.

असे आहेत मतदार

मराठी – 38 टक्के

मुस्लिम – 20 टक्के

उत्तर भारतीय – 19 टक्के

गुजराती – 15 टक्के

दक्षिण भारतीय – 1 लाख

ख्रिश्चन – 50 हजार

भाजपचा नाइलाज, तर मनसेचे फक्त फोटोसेशन

आमदार रवींद्र वायकर मिंधे गटात गेले तरी येथील शिवसैनिकांनी मात्र शिवसेनेची साथ सोडलेली नाही. रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते केवळ फोटोसेशनपुरतेच प्रचार रॅलीत दिसत आहेत. याचा फटका वायकर यांना निवडणुकीत बसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.