केडीएमसीच्या 490 पदांसाठी आजपासून लेखी परीक्षा; 55 हजार उमेदवारांसाठी 14 जिल्ह्यांत 25 केंद्रे

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विविध २१ संवर्गांतील ४९० पदांसाठी सरळसेवेने नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज भरण्याच्या १५ जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत ५५ हजार उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज केले असून उद्या मंगळवारपासून प्रत्यक्ष लेखी परीक्षा होत आहे. टीसीएस कंपनीच्या सहकार्याने ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील २५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होईल.

४९० पदांमध्ये तांत्रिक व कार्मिक अशा दोन्ही प्रकारांतील पदांचा समावेश आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. या परीक्षेसाठी कल्याण-डोंबिवली पालिकेचे ४२ समन्वयक आणि निरीक्षक अधिकारी नियुक्त केले आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मुख्य समन्वयाखाली ही परीक्षा पार पडणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ आणि संध्याकाळी ५ ते ७ अशा तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

या ठिकाणी केंद्रे

चंद्रपूर – कोटकर इन्फोसिस्टम, नाशिक भुजबळ नॉलेज सिटी, पुणे विद्यार्थी गृह कॉलेज, नांदेड एसएसएस इन्स्टिट्युट, राजीव गांधी कॉलेज, नागपूर – आयॉन डिजिटल, सेंट्रल इंडिया नर्सिंग, आकार कॉलेज, अमरावती – आयॉन डिजिटल झोन, कोल्हापूर- आयॉन डिजिटल झोन शिये, जळगाव – उज्जवला प्रायव्हेट आयटीआय, जळगाव विद्यापीठ, अहिल्यानगर – अचिव्हर्स इन्फोटेक, पुणे आयॉन डिजिटल झोन, रामटेकडी, नवी मुंबई – वायएमटी कॉलेज, खारघर, रायगड – मोहपाडा पील्लई एचओसी कॅम्पस, मुंबई ठाकूर इन्स्टिट्युट कांदिवली, जीएनव्हीएस संस्था शीव, आयॉन डिजिटल पवई.