
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील संदीप हॉटेल परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने १५० हून अधिक जणांना चावा घेतला होता. ही माहिती खुद्द केडीएमसीच्या डॉक्टरांनीच दिली होती. मात्र कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांबाबत प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
डॉ. पगारे यांनी माहितीची खातरजमा न करता प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याने केडीएमसी प्रशासनावर टीका झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. महापालिकेशी संबंधित विषयांवर अधिकृत माहिती देताना विभागप्रमुख, आयुक्त किंवा जनसंपर्क विभागाच्या माध्यमातूनच माहिती देणे आवश्यक असतानाही डॉ. पगारे यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. पगारे यांना २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी ही नोटीस बजावली.































































