
मराठीत एक म्हण आहे, ‘तेलही गेले, तूपही गेले अन् हाती धुपाटणे आले’ अशीच काहीशी अवस्था सध्या टीम इंडियाची झाली आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थानच्या संघात पार पडला. या लढतीत ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 209 धावांनी दारुण पराभव करत जेतेपदाची गदा उंचावली. सलग दुसऱ्यांदा हिंदुस्थानचा संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम लढतीत पराभूत झाला. यामुळे खेळाडूंवर टीकेचा भडीमार सुरू असतानाच आता आयसीसीनेही मोठी कारवाई केली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच हिंदुस्थानचा सलामीवीर शुभमन गिल यालाही दणका दिला आहे. दुसऱ्या डावात कॅमरून ग्रिनने घेतलेल्या वादग्रस्त कॅचनंतर गिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत आयसीसीने त्यालाही दंड ठोठावला आहे.
अंतिम लढतीमध्ये हिंदुस्थानच्या संघाने निर्धारित वेळेपेक्षा पाच षटकं कमी टाकली, तर ऑस्ट्रेलियाने 4 षटकं कमी टाकली. आयसीसीच्या नियम क्रमांक 2.22 नुसार प्रत्येक षटकाला 20 टक्के मॅच फी दंड म्हणून कापली जाते. त्यानुसार हिंदुस्थानच्या खेळाडूंची 100 टक्के मॅच फी, तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची 80 टक्के मॅच फी दंड म्हणून कापण्यात आली. त्यामुळे डब्ल्यूटीसीची अंतिम लढत खेळलेल्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला एक छदामही मिळणार नाही. यासह हिंदुस्थानचा तरुण खेळाडू शुभमन गिलवरही कारवाई करण्यात आली आहे.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाने 444 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर हिंदुस्थानकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला मैदानात उतरले होते. दोघांनी चांगली सुरुवातही केली. मात्र बोलंडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये कॅमरून ग्रिनने गिलचा वादग्रस्त झेल घेतला. तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. यानंतर गिलने यावर प्रतिक्रियाही दिली आणि सोशल मीडियावर पोस्टही टाकली. मात्र आंतरराष्ट्रीय लढतीत पंचांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेणे आयसीसीच्या नियम क्रमांक 2.7 चे उल्लंघण मानले जाते. याचा फटका गिलला बसला असून त्याला मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आली. त्यामुळे त्याला एकूण 115 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
‘चोकर्स’ टीम इंडिया, 2014पासूनची आकडेवारी आली समोर; मोक्याच्या क्षणी खाल्ली कच
जगज्जेतेपदांचा हारनामा
हिंदुस्थानचा संघ 2013 साली आयसीसीची अखेरची स्पर्धा जिंकला होता. यजमान इंग्लंडचा नमवत हिंदुस्थानने 2013 साली प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2017 साली हिंदुस्थानने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली पण पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली. त्यानंतर 2014 साली टी-20 च्या जेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने हिंदुस्थानला नमवले. एकदिवसीय वर्ल्ड कपचे 2011 ला जगज्जेतेपद पटकावल्यानंतर 2015 आणि 2019 च्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आयसीसी स्पर्धेतील हे अपयश कसोटी अजिंक्यपदातही कायम राहिले. 2021 साली पहिल्या डब्ल्यूटीसी जगज्जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्धही सहज हरला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याचीच पुनरावृत्ती झाली. म्हणजेच हिंदुस्थानचा आयसीसी स्पर्धेतील हारनामा कायम राहिलाय.
























































