याकूबच्या कबरीचं उदात्तीकरण दुर्दैवी; अंबादास दानवेंकडून भाजप नेत्यांच्या विधानाचा समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण करण्यात आले. कोविड काळात झालेल्या या सुशोभिकरणावरून आता नवा वाद पेटला आहे. भाजपनं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना नेते, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या वादावरून भाजपला लक्ष्य केलं आहे. याकूब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणं दुर्देवी आहे. ज्याने कुणी हा प्रकार केला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. परंतु अशाप्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना विचार केला पाहिजे की यांच्या काळात अतिरेक्यांना अफगाणिस्तानला कुणी सोडलं? कश्मीरमध्ये कित्येक अतिरेकी सोडले आहेत. मला वाटतं याला काळाशी, सत्तेशी याची सांगड न घालता, अतिरेक्यांना पाठिंबा देणारे, यामागचे मास्टर माइंड आहेत त्यांचा निषेध व्हावा, उदात्तीकरण योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अंबादास दानवे यांनी भाजपकडून सुरू असलेला अपप्रचार हा दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. ‘याकूब मेननचं समर्थन मराठी माणूस, मुंबईकर करणार नाही. याकूबच्या कबरीचं उदात्तीकरण निषेधार्हच आहे. याकूब मेननबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.

‘पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या मुफ्ती मेहबुबासोबत ज्यांनी कश्मीरमध्ये सत्ता उपभोगली त्यांनी आम्हाला शिकवू नये’, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.