दिल्लीनंतर हरयाणात यमुनेचा कोप; घग्गर धरण फुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर आल्याने देशाची राजधानी दिल्ली जलमय झाली असतानाच आता यमुना नदीच्या पुराचा हरयाणाला जोरदार फटका बसला आहे. राज्यातील अंबाला, पंचकुला, कुरुक्षेत्र, कर्नाल, यमुनानगर, पानिपत आणि कैथल जिह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

हरयाणातील काही जिह्यांत यमुनेचे पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. हरयाणातील 14 गावांत पाणी शिरले आहे. काही ठिकाणी शाळेची इमारत कोसळली आहे. तर सिरसा आणि फतेहाबाद येथील घग्गर धरणही फुटले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी घुसले आहे. रांगोई नालाही दोन ठिकाणी फुटला आहे. तर फतेहाबादमधील 3 गावांत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कर्नालमधील 34, पानिपतमधील 24, सोनिपतमधील 22 आणि यमुनानगरमधील 20 गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी गावातून स्थलांतर करीत आहेत.

लष्कर आणि एनडीआरएफकडून मदत

कुरूक्षेत्रात मार्कंडा नदीने कहर केला आहे. कैथल, फतेहाबाद, सिरसा या ठिकाणी घग्गर नदीच्या पाण्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. पूरग्रस्त भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अंबाला, कुरुक्षेत्र आणि कैथलमधील रहिवासी भागात पुराचे पाणी शिरले आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक अनेक जिह्यांत मदत आणि बचाव कार्य करीत आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

हरयाणात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा आणि डीएलईडी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हरयाणा राज्य सरकारने घेतला आहे. दहावी-बारावी कंपार्टमेंट परीक्षा आणि डीएलईडीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता 21 जुलै 2023 पासून सुरू होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

दोन राज्यांत 39 पूर बळी

पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांतील अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. या दोन्ही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दोन राज्यांत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे.  सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये 19 तर हरयाणामधील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील 22 हजारांहून अधिक नागरिकांना तर हरयाणातील 4 हजार 495 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जवळपास 14 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे.