
>> द्वारकानाथ संझगिरी
यशस्वी जैस्वाल कसोटी स्तरावर यशस्वी होतोय, त्याचे नाव यशस्वी ठेवणारे आईवडील द्रष्टे असावेत. एरवी हौसेने नृसिंह नाव ठेवलेले घाबरट निपजतात. त्याच्या आईवडिलांनी आणखीन एक चांगली गोष्ट केली. त्याला यूपीतून मुंबईत क्रिकेट खेळायला पाठवलं. आज क्रिकेटमध्ये मुंबईची पूर्वीची दादागिरी नसेल, पण अजून मुंबईच्या मातीला क्रिकेटचा सुगंध आहे. त्यामुळे त्याची मूलभूत गुणवत्ता अधिक सुगंधीत झाली. त्याला कष्ट पडले. आझाद मैदानावर तंबूत राहावं लागलं. कधीतरी त्याने पाणीपुरी विकली; पण आझाद मैदानाच्या तंबूत बसून वानखेडेचे दिवे पाहताना त्याच्या महत्त्वाकांक्षेने उंच झेप घेतली. दगड संगमरवर असला तरी सुंदर मूर्ती व्हायला छिन्नीचे घाव सहन करावे लागतात. तो तंबू, ती पाणीपुरी, ते कष्ट हे ते छिन्नीचे घाव होते. त्यामुळे आता ती मूर्ती घडायला लागली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन खेळी पाहताना मला काही गोष्टी जाणवल्या.
– टी-20 च्या पाळण्यात जन्म होऊनही चांगला कसोटी फलंदाज व्हायचं तंत्र आणि टेम्परामेंट त्याच्याकडे आहे.
– हिंदुस्थानला कसोटीत वरच्या फळीत चांगल्या डावखुऱया फलंदाजांची असलेली गरज तो भागवू शकतो.
– मूलतः आक्रमक फलंदाज असल्यामुळे फटके तो मुक्तपणे खेळतो. फटका मारताना तो चेंडू पाहतो; गोलंदाज, शेवटचा चेंडू आहे की पहिला, 49 वर आहे की नव्वदीत वगैरे नाही. शुक्रवारच्या खेळीत तरी त्याची फटक्यांची निवड चांगली होती.
– टिपिकल डावखुऱया फलंदाजाप्रमाणे त्याचे ऑफच्या फटक्यांवर प्रेम आहे. आजच्या युगाचा असल्यामुळे फिरकी गोलंदाजाला पुढे सरसावत तो लीलया फेकतो. टी-20 ने जन्माला घातलेले फटकेही त्याच्या भात्यात आहेत.
– जेम्स ऍण्डरसनने त्याची परीक्षा घेतली. या वयातही काय गोलंदाजी टाकतो हा माणूस! यशस्वी जैस्वाल याने त्याला आदर दाखवला. बऱयाचदा चेंडू उत्तमपणे सोडले. उगाच ऍण्डरसनचा गर्व उतरवण्यासाठी बेदरकार हल्ला चढवला नाही.
– समोर विकेट्स पडत असताना त्याने शांतपणे फलंदाजी केली. फटक्यांवर फालतू बंधने घातली नाहीत. आणि मुख्य म्हणजे, मोठी धावसंख्या उभारण्याची त्याची वृत्ती. 50 झाले की त्याचे शतक करण्याची जिद्द तो या सर्वोच्च स्तरावरही दाखवतोय.
अर्थात, अजून कठोर परीक्षा त्याला कसोटी स्तरावर द्यायच्या आहेत. मग ती इंग्लंड ऑस्ट्रेलियात असेल किंवा न्यूझीलंडमध्ये. कारण इंग्लंडचा हा मारा तसा चणेफुटाणे आहे. अपवाद जेम्स ऍण्डरसन. पण या क्षणी तरी त्याने आपली नजर वानखेडेच्या दिव्यापलीकडे रोखलेली आहे आणि जगभरातल्या स्टेडियमपर्यंत उडायचा मनसुबा त्याच्या बॅटने व्यक्त केलाय.




























































