दहीहंडी कार्यक्रमातील वक्तव्य नवनीत राणांना भोवणार; यशोमती ठाकूर ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता त्यांचा बोलघेवडेपणा त्यांच्या अंगलट येणार आहे. दहींहडीच्या कार्यक्रमात त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांविरोधात 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. या वक्तव्यांमुळे आता राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील संघर्ष वाढला आहे. नवनीत राणा यांनी दहीहंडी कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा दावा नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर यशोमती ठाकूर संतापल्या आहेत. या आरोपानंतर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला. राणांनी शहाणपण करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणावं, नाहीतर राजकारण सोडून देऊ, असे आव्हान ठाकूर यांनी राणा यांना दिले.

या त्यांच्या वक्तव्याविरोधात यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. आमदार ठाकूर म्हणाल्या, ते नवरा-बायको म्हणजेच राणा कंपनीने आजवर अमरावती जिल्हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांचे जिल्ह्यात कोणाशीच पटत नाही. आधी ते आमदार बच्चू कडूंबाबत बोलले, मग त्यांनी माफी मागितली. यांनी प्रत्येकावर आरोप केले. मुळात राणा दाम्पत्य काय दुधाने धुतलेले आहेत का? हीच सगळ्यात घाणेरडी मंडळी आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. अशी बिनबुडाची वक्तव्ये आणि आरोप आम्ही सहन करणार नाही.

नवनीत राणा यांनी गेल्या आठवड्यात अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचे काम ठाकूर यांनी केलं होते. यावर यशोमती ठाकूर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, उगाच अफवा पसरवायच्या नसतात. आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकारले होते. निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण, वहिनींचे प्रमाणपत्रच खोटे निघालं. त्या स्वत: चोर निघाल्या, असा हल्ला ठाकूर यांनी चढवला. यशेमती ठाकूर दाखल करणार असलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे राणा दाम्पत्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.